जळगावची घटना महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला कलंकित करणारी – धनंजय मुंडे

15 Jun 2018 , 10:11:55 PM

जळगावमधील घटना ही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला कलंकित करणारी असून यामधील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी गावात मातंग समाजातील दोन मुलांना मारहाण करुन त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. या अमानवी घटनेनंतर राज्यभरातून संतापाच्या तीव्र भावना व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.
जळगावमध्ये जो प्रकार घडला तो पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा आहे. जळगाव जिल्ह्यातील मातंग सामाजाच्या काही मुलांवर क्षुल्लक कारणावरुन ज्यापध्दतीने नग्न करुन मारहाण करण्याचा प्रकार समोर आला तो या शाहु,फुले,आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील पुरोगामीत्वाला काळीमा फासणारा आहे.

मागील तीन-चार वर्षात महाराष्ट्रात आणि देशात वारंवार अशा घटना घडत आहेत. या घटना सरकार पुरस्कृत आहेत की काय किंवा या सरकारमध्ये काही जणांची अशापद्धतीने जातीवाद अशा करायची हिंमत वाढते आहे. त्यामुळे याला सरकार जबाबदार आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

कुठेतरी आता आपल्या सगळ्या प्रयत्नातूनच येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं पुरोगामित्व जिवंत ठेवावं लागणार आहे. शाहु, फुले, आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र अबाधित रहावा यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी यावेळी केले आहे.

संबंधित लेख