'सामना'तील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना पगडी वाद पेटवत आहे - नवाब मलिक

13 Jun 2018 , 09:39:53 PM

राज्यभरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पगडीवरून वाद रंगवला जात आहे. 'सामना'तील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना पगडी वाद पेटवत आहे, असा आरोप मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्याही पगडीला विरोध केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा फुले, शाहु आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. महात्मा फुले यांची पगडी वैचारिक पगडी आहे. पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही पक्षाच्या स्थापनेपासून प्रयत्न करत आहोत, पण शिवसेनेला समतावादी विचार पटत नाही, असे मलिक म्हणाले. शिवसेनेने मंडल आयोगाला विरोध केला होता. दलित, ओबीसी, आदिवासी या समाजाला आरक्षण देण्याच्या वेळीही शिवसेनेने वाद निर्माण केला होता. महिला आरक्षण देण्याच्या वेळी स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की महिलांनी फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित रहावे. शिवसेनेचे विचार प्रतिगामी आहेत. महात्मा फुले यांचे समानतावादी विचार शिवसेनेला पटत नाहीत म्हणून ते टीका करत आहेत. शिवसेना केवळ एका पगडीला का घाबरत आहे. फुले यांच्या पगडीत मोठी ताकद आहे हे यातून स्पष्ट होते, असेही मलिक पुढे म्हणाले.

संबंधित लेख