लोकांच्या उद्धारासाठी काम करणे हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव सूत्र

11 Jun 2018 , 06:56:39 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १९ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत नाकर्त्या सरकारविरोधात पक्षाने सुरू केलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या पश्चिम महाराष्ट्र टप्प्याची सांगता सभा पुण्यात आयोजित करण्यात आली. पुणे येथील शिंदे हायस्कूल मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा घेण्यात आली. पक्ष विसाव्या वर्षात प्रवेश करता असताना ज्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सभा झाली ते छगन भुजबळ आजच्या सभेत मुक्तपणे बोलण्यासाठी उपस्थित होते, याचा आनंद पवार साहेबांनी व्यक्त केला.

गेल्या अनेक वर्षात अनेक चढउतार पाहिले. लोकांच्या उद्धारासाठी काम करायचं हेच सूत्र राष्ट्रवादीने ठेवलं. आज पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याची घडी आली आहे. देशासमोर पर्याय दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. मी देशाच्या सगळ्या राज्यांत जातो. लोकांना पर्याय हवा आहे. देशाच्या विविध पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद साधतोय. या सगळ्यांना आपण एकत्र करू शकतो आणि आणि त्यांची तशी मानसिकता आहे. ती शक्ती जर उभी करू शकलो तर भाजपाच्या समाजातील केवळ मूठभर लोकांच्याच हिताची जपणूक करण्याच्या भूमिकेचा शंभर टक्के पराभव करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने नोटाबंदी केल्याचं कारण सांगितलं की त्यांना काळा पैसा संपवायचा होता. आज तुम्ही नेपाळमध्ये गेलात, चौकशी केली तर कळतं की ठिकठिकाणी भारतीय जुनं चलन लोकांच्या हातामध्ये आहे. नोटा बदलून द्यायचं काम आज नेपाळमध्ये होतंय. नोटाबंदी केली पण ती या देशातल्या सामान्य माणसासाठी. आमच्या आयाबहिणींनी आयुष्याची कमाई कुठे तरी साठवून ठेवली होती. ती उद्ध्वस्त करण्याचं काम यांनी केलं आणि शेजारच्या देशातील व्यापारी व अन्य घटकांकडे ते चलन ठेवण्याची आणि त्याला मान्यता देण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. भंडारा-गोंदिया येथे निवडणुकांच्या वेळी झालेल्या प्रकारावर भाष्य करताना त्यांनी भाजपा सोडून सगळ्या पक्षाच्या सहकाऱ्यांना विनंती केली की आपण सगळे मिळून निवडणूक आयोगाकडे जाऊ आणि काही झालं तरी हे मशीन आम्हाला नको, इथून पुढे नेहमीच्या पद्धतीने निवडणुका घ्या, असे सांगण्याचे आवाहन केले.

जवळजवळ अडीच वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा आक्रमक होत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. न्यायदेवतेचे आभार मानत त्यांनी निर्दोषत्व सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. दोन वर्षांपूर्वी माझ्यावर खूप हल्ले झाले. सात सात वेळा धाडी टाकल्या. कारण नसताना तुरुंगात टाकले. जिथे भुजबळ नाव असेल तिथे धाडी टाकल्या. मोठ्या प्रमाणात दबावतंत्राचा वापर झाला. सापडले काहीच नाही पण बाहेर भरपूर सांगितले, असे त्यांनी स्पष्ट केले.

"मैं जिंगदी का साथ निभाता चला गया", हे गीत म्हणत भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या भावना व्यक्त केल्या. देशात चार शहरांची नावे सांगा जी चार वर्षात स्मार्ट झाली, चार जिल्हे सांगा जिथे तुम्ही स्वच्छतागृह बांधली, चार जिल्हे सांगा जिथे वीज पुरवली आहे, पाणी पुरवले आहे, रस्ते नीट केले आहे. गंगा नदीला हे स्वच्छ करणार होते...चार पाऊले तरी गंगा साफ झाली का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. १७ टक्के आरक्षण शिल्लक आहे त्यात ७०० जाती आहेत. त्यामुळे आरक्षण वाढवा हीच मागणी आहे. यासाठी आंदोलन करण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली.
लोकांना वाटत होतं की विदर्भात राष्ट्रवादीची ताकद नाही पण तसं काही नाही. भंडारा-गोंदियातील विजय त्याचे उदाहरण आहे. विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, मुख्यमंत्री तळ ठोकून होते. पण त्याच भूमीत आपण भाजपचा पराभव केला. हा विजयी रथ असाच पुढे न्यायचा आहे, असे वक्तव्य खा. प्रफुल पटेल यांनी केले. हल्लाबोल आंदोलनामुळे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा संचारली आहे. पवार साहेबांच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. कर्नाटकात सर्व विरोधक एकत्र आले. सर्व दिग्गज होते मात्र अनुभवी माणसाच्या गरजेची पोकळी साहेबांनी भरून काढली, असेही ते म्हणाले. हे सरकार घाबरले आहे म्हणून विरोधकांवर दबाव टाकला जात आहे. भुजबळ साहेबांवरही यामुळेच मुद्दाम कारवाई केली गेली. भाजपने महापाप केले आहे. यांना धडा शिकवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

याठिकाणी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक चढउतार पाहिले. सत्तेत असताना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बुथ कमिट्यांवर भर देण्याचे ठरवले आहे. बुथ कमिट्यांचे काम नीट केले तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंबर एकचा पक्ष बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अफवा पसरवली जाते की राष्ट्रवादीत फक्त ठराविक समाजाची मक्तेदारी आहे. हे खरे नाही. हा पक्ष सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारा आहे. म्हणून जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी उभी करताना सर्व समाजघटकांचा यात समावेश असावा असा आमचा आग्रह आहे, हेही त्यांनी नमूद केले. भाजपचा नवा नारा 'सबका साथ, सबका विश्वासघात' असा आहे. जेवढा विश्वासघात यांनी केला तेवढा कोणीच केला नाही. भारतात टीव्ही, कम्प्युटर, इंटरनेट या सुविधा युपीएच्या सरकारने आणले. मोदींनी याचाच वापर करत निवडणूक जिंकली. त्यामुळे मोदी हे टीव्हीतून आलेले पंतप्रधान आहेत, असे जयंत पाटील म्हणाले. या सरकारचे निर्णय अपयशी ठरले. नोटाबंदी फेल गेली, देशाची आर्थिक स्थिती ढासळली. दलित, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्यावरील अत्याचार याच सरकारच्या काळात वाढले. देशातील जनता अस्वस्थ आहे. ही अवस्थता भंडारा-गोंदिया निवडणुकीत दिसली, असेही ते सरकारवर टीका करताना म्हणाले.

औरंगाबादच्या हल्लाबोल सभेत ज्याप्रमाणे इंटरनेट बंद करण्यात आले होते तसेच याही सभेत करण्यात आले. भाजप करोडो रुपये जाहिरातीवर खर्च करते मग विरोधकांचा आवाज जनतेपर्यंत का जाऊ देत नाही? रडीचा डाव का खेळतात, असे प्रश्न उपस्थित करतानाच सत्ता काही कायमची नसते, असा इशाराही विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिला. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा सुरू असताना मुख्यमंत्री माधुरीला भेटायला गेले. तुम्ही जरूर सेलिब्रिटींना भेटा पण राज्यातील शेवटच्या माणसालाही भेटा. या सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे. सर्व लोक संप करत आहेत. लोक आक्रमक झाले तरच तोडगा का काढला जातो, असाही प्रश्न त्यांनी सरकारवर डागला. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढतायत, गॅस सिलेंडरच्या किमती वाढतायत. सामान्य माणसाला अडचणीत आणणारे निर्णय ज्यावेळी होतील त्यावेळी आपला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरला पाहिजे. अख्खा महाराष्ट्र आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमय करायचा आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. भंडारा-गोंदियातील सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतानाच अजित पवार यांनी सर्व विरोधक तिथे एकत्र आले आणि त्यांनी भाजपला धडा शिकवला. समविचारी लोकांची मतविभागणी होऊ नये यासाठी आपण अनेकांना बरोबर घेण्याची भूमिका घेणार आहोत. तरच भंडारा-गोंदियासारखं यश आपल्याला लाभेल, असा विश्वास व्यक्त केला. विदर्भात यश मिळू शकतं तर पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. इथे तर एकतर्फी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ चाललं पाहिजे. उद्या मराठवाड्यात, कोकणात, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये आणखी जोरात आपल्याला काम करायचं आहे, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. पश्चिम महाराष्ट्राच्या हल्लाबोलची आज सांगता सभा झाली असली तरी हे आंदोलन इथे थांबणार नाही. जेव्हा जेव्हा जनतेवर अन्याय होईल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनतेच्या पाठिशी उभी राहील. संपूर्ण राज्य आता राष्ट्रवादीमय करायचं आहे, असेही ते म्हणाले. ज्या उद्देशाने तुम्ही पवारसाहेबांना साथ दिली त्याच उद्देशानं नवीन पिढीला सोबत घेऊन आम्ही सर्व चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र ढवळून काढू. २०१९ चा वर्धापन दिन साजरा करत असताना राज्य व केंद्रामध्ये आपल्या विचाराचं सरकार आलेलं असेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या ठिकाणी बोलताना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी भाजपने चार वर्षांत लोकांच्या अपेक्षा केवळ पायदळी तुडवल्याचे म्हटले. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी शरद पवार साहेबांनी राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले. देशाने हरितक्रांतीही पवार साहेबांमुळे पाहिली. आजही शेतकऱ्यांच्या भूमिकेत राहून पवार साहेब कार्यरत आहेत. देशाला त्यांच्या विचारांची गरज आहे, असेही ते म्हणाले. या नाकर्त्या सरकारला उत्तर देण्याची ताकद राष्ट्रवादीत असून आगामी काळात आपली सत्ता निश्चितच येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदानी तोफ विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या खास शैलीत सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजपने ‘साफ नियत, सही विकास’ अशी नवी घोषणा दिली आहे. भाजपला माहित आहे की त्यांना त्यांच्या आधीच्या घोषणांच्या जोरावर आता मते मिळणार नाहीत. नरेंद्र मोदी यांची नियत कशी आहे हे संपूर्ण देशाला आता कळले आहे, असे ते म्हणाले. शिवराज्याभिषेकाचा दिवस विसरून अमित शाह मुख्यमंत्र्यांसोबत माधुरी दीक्षितला भेटले. त्यांना यशाची पुस्तिका दाखवून काय साधलं? महागाई, दरवाढीची झळ त्यांना समजणार आहे का? शिवराज्यभिषेकास न जाता माधुरीच्या घरी गेलेल्यांना शिवरायांचा मावळा विसरणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. भाजपाप्रमाणे आपण विरोधक म्हणून यांनी चार वर्षात केलेल्या चुकीच्या कामाची पुस्तिका काढू. ते माधुरीकडे गेले, आपण मजुरांकडे जाऊ. ते टाटाला भेटले आपण सामान्य माणसापर्यंत जाऊ. ते कपिल देवकडे गेले आपण बळीदेवाला भेटू, त्यांचे प्रश्न सोडवू, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. पुढील वर्षी ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका संपतील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २० वा वर्धापनदिन साजरा करेल तो सत्तांतराचा, परिवर्तनाचा स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करू, असेही ते यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान बोलताना गेल्या दोन दशकांत राष्ट्रवादी महिलांचा, शेतकऱ्यांचा, जनसामान्यांचा आधार झाली, असे वक्तव्य केले. पवार साहेबांना एक फोन केला की शेतकऱ्यांना मदत मिळायची मात्र गेल्या चार वर्षांत मदत मिळणे बंद झाले आहे. महिला सुरक्षित नाहीत. आता या सरकारला वेळीच खाली खेचण्याची गरज आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या पाच खासदारांचा सत्कार करण्यात आला. तसेच, लोक माझे सांगाती या शरद पवार साहेबांच्या ऑडियो बुकचे प्रकाशनही करण्यात आले. या सभेस खासदार वंदना चव्हाण, आ. हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख जयदेव गायकवाड, आयटी सेलचे प्रमुख सारंग पाटील तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी संबोधित केले. यावेळी खा. सुप्रिया सुळे, माजी विधान सभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ तसेच पक्षाचे सर्व दिग्गज नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व अलोट जनसागर या सभेस उपस्थित होता.

संबंधित लेख