कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे नजीब मुल्ला यांना उमेदवारी जाहीर

07 Jun 2018 , 10:52:47 PM

वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील कार्यकर्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी आगामी कोकण पदवीधर निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नजीब मुल्ला यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. या मेळाव्यासाठी राष्ट्रीय सरचिटणीस खा. डी.पी.त्रिपाठी, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते गणेश नाईक, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, माजी विधान सभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. भास्कर जाधव, आ. जितेंद्र आव्हाड, कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, आ. प्रमोद हिंदुराव, आ. अनिकेत तटकरे, शेकापचे आ. जयंत पाटील, विवेक पाटील, बाळाराम पाटील, काँग्रेसचे आ. भाई जगताप, आ. हर्षवर्धन पाटील, संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक, राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सामान्य कुटुंबात जन्म घेऊन, सामान्यांना संघटित करत स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या सैन्यात सर्व जाती-जमातीचे लोक होते. सर्व समाज घटकातील लोकांना एकत्र आणून लोकांसाठी राज्य चालवायचे अशी महाराजांची भूमिका होती. त्याचप्रमाणे नजीब मुल्लाही काम करत आहेत, असे म्हणात अतिशय चांगला उमेदवार गणेश नाईक यांनी निवडल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे शरद पवार यांनी अभिनंदन केले. देशात लोकांचे मन आणि मत बदलत आहे. उत्तर प्रदेशात रिक्त झालेल्या जागेवर भाजपला पराभव स्वीकारावा लागला. भाजपच्या निवडून आलेल्या जागाही त्यांनी गमावल्या. पालघरमध्ये जर काळजीपूर्वक निर्णय घेतले गेले असते तर कदाचित तिथेही निकाल वेगळा लागला असता, असेही मत त्यांनी व्यक्त केले. येणाऱ्या सर्व निवडणुका आता आपल्याला एकत्र राहून लढलं पाहिजे. त्यामुळे नजीब मुल्लाला निवडून देण्यासाठी आपल्याला अहोरात्र काम करावे लागेल, असे आवाहन त्यांनी उपस्थित सर्व विरोधी पक्षांतील नेत्यांना केले. यश आपल्याला नक्कीच मिळेल. आपण हे काम आव्हान म्हणून स्वीकारले पाहिजे, असे ते म्हणाले.

पुढच्या निवडणुकांमध्ये काय घडू शकते याची चुणूक आज कोकण पदवीधर मतदारसंघ कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून दिसली. १५ वर्षांच्या काळात आघाडी सरकारने केलेल्या कामांमुळे इथला विकास झाला. त्यामुळे इथला तरुण राष्ट्रवादीच्या विचारांचा आहे यात दुमत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. शिवाजी महाराजांच्या काळातही फितूरी झालीच.आज तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर आपल्याच माणसाने पक्ष बदलला. अशा परिस्थितीत आपण नजीब मुल्ला यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे सांगत त्यांनी नजीब मुल्ला यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त केला. साम-दाम-दंड-भेदाचा वापर मुख्यमंत्री करत आहेत. जे समोर दिसेल त्याला पक्षात प्रवेश दिला जात आहे. जो भाजपमध्ये जात नाही त्याच्या मागे इडीची चौकशी लावली जात आहे. भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते दिसतच नाहीत. त्यामुळे विरोधी पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्रात परिवर्तन घडेल, असेही ते म्हणाले.

परिवर्तनाची सुरुवात भंडारा-गोंदिया येथून झाली आहे. नजीब मुल्ला हे संघर्ष करणारे कार्यकर्ते आहेत ते नक्कीच ही निवडणूक जिंकतील असा विश्वास राष्ट्रीय सरचिटणीस डी.पी. त्रिपाठी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. २०१४ साली जे सत्तापरिवर्तन झाले त्यात तरुणांचा मोठा वाटा होता. या तरुणांना मोठमोठी आमिषे देण्यात आली होती. पण आजपर्यंत त्यांना दिलेले आश्वासने पूर्ण करण्यात आलेली नाहीत. तरुण वर्ग आज नाराज आहे त्यामुळे या निवडणुकांमध्ये या तरुणांची मते महत्त्वाची ठरणार आहेत, असे मत राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. देश आता परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. पदाधिकाऱ्यांनी सर्व मतदारांपर्यंत पोहोचायचे ठरवले तर आजच या निवडणुकांचा निकाल स्पष्ट होईल. निवडणुकांसाठी फक्त १५ दिवस उरले आहेत. आपण नक्कीच मतदारांपर्यंत पोहोचू आणि विजय संपादन करु, अशी साद त्यांनी कार्यकर्त्यांना घातली.

सुशिक्षित मतदारांची संख्या आमच्याकडेच आहे असा भाजपचा भ्रम होता. मात्र आता तो तुटला आहे. बहुजन समाज आता सुशिक्षित झाला आहे. पदवीधर मतदार आता हुशार झाला आहे त्यामुळे त्याने नोंद करून ठेवली आहे, असे वक्तव्य आ. भास्कर जाधव यांनी केले. तर या निवडणुकांच्या निमित्ताने आपल्याला देशात आणि राज्यात आता बदल घडतोय हा संदेश द्यायचा असल्याचे माजी विधान सभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आवाहन केले. या सरकारकडून कोणालाच मदत मिळत नाही. शेतकरी, उद्योगपती, सामान्य जनता सर्वच जण हैराण आहेत. भाजपला प्रत्येक ठिकाणी पराभव मिळत आहे. आपल्याला पुढे मोठ्या निवडणुका लढवायच्या आहेत. आता सर्व विरोधी पक्षांनी या सरकारविरोधात आघाडी खोलण्याचे ठरवले आहे त्यामुळे आता परिवर्तन निश्चित आहे, असे ते म्हणाले.

आ. नरेंद्र पाटील यांनी आम्ही आजपर्यंत फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच काम केले आहे, आम्हाला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही, अशा शब्दांत त्यांच्याबद्दल उठलेल्या वावड्यांबाबत उत्तर दिले. आता जी जबाबदारी आमच्यावर टाकली आहे ती आम्ही पूर्ण करू, असे ते म्हणाले.

इतिहास बदलण्याची धमक ही आपल्या महाराष्ट्रात आहे. भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक आपण जिंकली. कोकणातूनही आपले अनिकेत तटकरे विजयी झाले आता कोकण पदवीधर मतदारसंघ जिंकण्याची वेळ आहे, असे आवाहन आ. शशिकांत शिंदे यांनी केले. अनेक जण इथे आपले डाव खरे ठरवण्यास निघाले आहेत मात्र त्यांचे डाव खोटे ठरवा, असा टोलाही त्यांनी लगावला.

कोकण पदवीधर मतदारसंघ कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित करताना ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी देशात परतीचे वारे वाहू लागले आहे, भंडारा-गोंदिया व इतर पोटनिवडणुकांचे निकाल ही त्याची उदाहरणे आहेत, असे म्हटले. या मतदारसंघाचा कौल आपल्या बाजूने आहे. कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यायला हवी असा संदेश दिला.

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी नजीब मुल्ला यांनी शिवराज्याभिषेकाच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला. यासारखा चांगला मुहूर्त नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. शिवाजी महाराजांनी कधीच गद्दारांना माफ केले नाही. पक्षातील गद्दारांनाही जागा दाखवण्याची गरज आहे असे वक्तव्य त्यांनी केले.

संबंधित लेख