‘देशातील तहज़ीब कायम राहो’ राष्ट्रवादीच्या रोजा इफ्तारमध्ये एकतेचा संदेश

07 Jun 2018 , 07:51:43 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार दावतला दरवर्षीप्रमाणे खा. शरद पवार यांनी उपस्थिती लावली आणि सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. इफ्तार दावतला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवांचे त्यांनी आभारही मानले.

दुर्दैवाने आपल्या देशात काही संघटना आहेत, काही पक्ष आहेत जे देशातील बंधुत्व भावनेत कटुता आणू पाहत आहेत, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. काही प्रतिगामी शक्ती इफ्तार दावतचे आयोजन करत असल्याचे वर्तमानपत्रात वाचले. नागपुरातील एका संस्थेने यावर्षी रोजा इफ्तार दावतचे आयोजन केले होते. हा लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असल्याचे वक्तव्य पवार यांनी केले. जे लोक कधी टोपी घालत नव्हते ते इफ्तारची दावत ठेवत आहेत. या लोकांची मनं साफ नाहीत म्हणून असे प्रकार केले जात आहेत. ही परिस्थिती लवकरच बदलावी अशी आशा पवार यांनी व्यक्त केली.

मागील काही वर्षांत देशाचे वातावरण बदलले आहे. प्रतिगामी विचार बाजूला सारत देश कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असा विचार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इफ्तारीनिमित्त मांडला. देशातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारे नेतृत्व म्हणजे पवार साहेब! या शब्दात खा. प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची स्तुती केली. आज आपल्या देशात सर्वच गोष्टींवर बंधने घातली जात आहेत. कोण काय खाणार, काय घालणार हे ठरवले जात आहे. ही गोष्ट योग्य नाही. आपल्या देशात असे वातावरण कधीच नव्हते. ही परिस्थिती बदलेणे गरजेचे आहे. पवार साहेबांनी नेहमी अल्पसंख्याक समाजाचा विचार केला. आज अल्पसंख्याक समाजाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत पटेल यांनी व्यक्त केली.

गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार साहेब ही दावत आयोजित करत आहेत. सर्वधर्मातील लोक एकत्र यावे हा त्यामागचा उद्देश असतो. आपल्या भारताला गंगा-जमनाई तहज़ीब आहे ती तहज़ीब कायम राहो यासाठी आमच्या पक्षाचा प्रयत्न असेल असे वक्तव्य प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी केले.
या इफ्तार दावतसाठी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस डी.पी.त्रिपाठी, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. माजिद मेमन, खा. फौजिया खान, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजेश टोपे, आ. विद्या चव्हाण, अल्पसंख्याक सेलचे गफार मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इतर प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.

संबंधित लेख