साखर पाकिस्तानातून आयात करून शेतकऱ्याला उद्धवस्त करण्याचा सरकारचा कट - जितेंद्र आव्हाड

14 May 2018 , 09:54:22 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड  यांनी पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून ही साखर साठवलेली गोदामे फोडून त्यांनी निषेध व्यक्त केला. दहिसर गावातील एका गोदामात पाकिस्तानी साखर साठवल्याची माहिती मिळताच आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसोबत गोदाम फोडले तसेच तेथील साखरेचे पोते फाडून आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी माजी खासदार आनंद परांजपे यांनीही आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला.

दरम्यान, राज्यातील हवालदिल झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ नव्हे, तर साखर चोळण्याचं काम मोदी सरकार करत असून ही साखर विकत न घेण्याचं आवाहन आव्हाड यांनी केलं आहे. तसेच ज्या गोदामात ही साखर सापडेल त्या गोदामाला आग लावण्याचा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे. भारतीय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानची साखर आयात करण्याचे धोरण सरकारने आखले आहे. मात्र ही साखर भारतात विकू देणार नसल्याचेही आव्हाड यांनी स्पष्ट केले. यावेळी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख