सरकारने साखरेच्या निर्यातीसाठी परवानगी द्यावी - शरद पवार

05 May 2018 , 08:26:23 PM

सध्या देशभरात साखर कारखाने कठीण परिस्थितीत आहेत. साखर उत्पादक शेतकरी आणि कारखानदारांना वाचवण्यासाठी सहकार क्षेत्राची निर्मिती झाली होती पण आज हेच क्षेत्र अडचणीत आले आहे. त्यामुळे सहकार वाचविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने साखर उद्योगाची सद्य परिस्थिती, उद्योगासमोरील अडचणी आणि पुढील वाटचालीवर चर्चासत्राचे आयोजन शुक्रवारी साखर भवन, मुंबई येथे करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. साखरेशी संबंधित सर्व लोक एकत्र एका ठिकाणी आहेत, अशी ही पहिलीच बैठक आहे. म्हणून या चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे आभार मानतो, असे पवार म्हणाले.
 
देशात साखरेचे उत्पादन वाढले आहे, पुढील वर्षी हे उत्पादन अधिक वाढेल. त्यामुळे साखरेचे वाढते उत्पादन लक्षात घेऊनच आपल्या पुढील पावले उचलायला हवीत. या समस्येवर निर्यात हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या साखरेला मार्केट नसल्याने साखर कारखानदारांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. साखर कारखाने हा तोटा कसा भरून काढणार? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर कारखान्यांना मदत करावी, तसेच सरकारने निर्यातीसाठी परवानगी द्यावी, असे आवाहन पवार यांनी केले. करत असते. कित्येकदा ही मदत आर्थिक स्वरूपाची असते. आजची परिस्थिती पाहता सरकारने या देशांना साखरेची मदत करावी. त्यामुळे गरीब देशांनाही मदत होईल आणि निर्यातीमुळे आपल्या देशातील उसाचे दरही वाढतील, अशी सूचनाही त्यांनी केली. 

बैठकीत चर्चेत असलेले काही प्रश्न महाराष्ट्र सरकारशी संबंधित असले तरी प्रामुख्याने अनेक प्रश्न हे केंद्र सरकारशी संबंधित आहेत. त्यामुळे या सर्व विषयांवर वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याची गरज असून यासंदर्भातील एक निवेदनही तयार करायला हवे. त्यासाठी १० ते १२ सदस्यांचा सहभाग असलेली एक समिती गठित करायला हवी. आपण हे निवेदन घेऊन केंद्र सरकारकडे जाऊ व सरकारला मदत करण्याची विनंती करू. केंद्र सरकार या मागण्यांचा सकारात्मक विचार करेल, अशी आशा पवार यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख