संभाजी भिडेच्या अटकेसाठी दलित समाजाची तीव्र भावना - नवाब मलिक

03 May 2018 , 06:16:10 PM

भिमा-कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे यास अटक व्हावी, या मागणीसाठी एका तरुणाने बुधवारी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही फार गंभीर बाब असून भिडेला अटक व्हावी या मागणीसाठी दलित समाजाची भावना किती तीव्र आहे हे यातून दिसून येत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी केले. आरोपीला अटक करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण सरकार टाळाटाळ करत आहे. मात्र दलित समाजाचा प्रक्षोभ पाहता सरकारने वेळीच जागे व्हायला हवे, असे मलिक म्हणाले. सरकारने आरोपीवर तात्काळ कारवाई करावी. सरकार काहीच करत नाही म्हणून जनता हा मार्ग निवडत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आघाडीबाबत बोलताना, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी आघाडीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसची चार जागांची मागणी कायम असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल आणि अधिकृत घोषणाही केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. लातूर-उस्मानाबाद-बीड येथे राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त आहे. एक एक जागा निवडून आणणे सध्या गरजेचे आहे. भाजप - सेनेचा पराभव व्हावा यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख