सरकारतर्फे कर्जमाफीची बनवाबनवी – शंकरआण्णा धोंडगे

18 Aug 2017 , 08:45:18 PM

या सरकारची शेतकऱ्यांना काही देण्याची नियतच नाही. सरकारची कर्जमाफी म्हणजे निव्वळ बनवाबनवी आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सेलचे अध्यक्ष शंकरआण्णा धोंडगे यांनी सरकारवर केली. किसान मंच व शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियानाची जनजागरण मोहीम हिंगोली जिल्ह्यात पोहोचली, त्यावेळी तेथील सभेला संबोधित करत असताना ते बोलत होते.

या सरकारने ६८ पिकांच्या उत्पादनात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे जागतिक व्यापार परिषदेला कळवल्याने सरकारची दुतोंडी भूमिका पाहता हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे, असा आरोपही त्यांनी केला. कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार व कधी मिळणार हा शोधाचा विषय झाला आहे. रिझर्व्ह बँकेने राज्याच्या कर्जमाफीच्या प्रस्तावाला नकार दिला असून कर्जाचे सर्व पैसे भरा असे राज्य सरकारला कळवले आहे. राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या २५ टक्के रक्कम अशा प्रकारच्या निर्णयासाठी वापरता येते पण ही वापरण्याची सरकारची नियत नाही असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गोडगोड बोलतात, तिकडे केंद्र सरकार राज्य सरकारला शेतीच्या प्रश्नावर एक रुपयाची मदत करत नाही. या उलट भरमसाठ शेतमाल आयात करण्याच्या प्रकाराने शेतकऱ्यांच्या मालाची बाजारपेठेत वाट लावण्याचे काम केंद्र सरकारने केले. केंद्र सरकारने जागतिक व्यापार परिषदेला दिलेल्या अहवालानुसार देशामध्ये ऊस वगळता एकूण ६८ पिकांच्या उत्पादनात शेतकरी प्रचंड तोट्यात असल्याचे कळवत असेल तर मदत करण्याचे काम कोणाचे आहे हे समजले पाहिजे. सरकारच्या दुतोंडी भूमिकेमुळे शेतकरी नागावला गेला आहे, अशी टीका त्यांनी केली.

संबंधित लेख