राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सांगली येथील मेळाव्यास व रॅलीस युवकांचा प्रचंड प्रतिसाद

17 Aug 2017 , 09:26:36 PM

देशातील तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊन बेरोजगारी कमी करण्याचे आश्वासन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी दिले होते. गेल्या तीन वर्षांत किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी उपस्थित केला. सांगली येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. गाव तेथे शाखा या उपक्रमांतर्गत हा मेळावा आयोजित केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी प्रचंड प्रतिसाद दिला.

सांगली येथील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस या चार तालुक्यांतील युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ गाव शाखांचे कोते पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. विविध गावांच्या शाखा उद्घाटन समारंभात पाटील यांनी युवक राष्ट्रवादीच्या संघटन व कामाची दिशा स्पष्ट करताना आक्रमकपणे शासनाच्या धोरणावर प्रहार केला. देशातील तरुणांची फसवणूक करणाऱ्यांना तरुणच धडा शिकवतील असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला. राज्यात ५ हजार शाखा सुरू करून साधारण २ लाख तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी जोडण्याचा आमचा मानस आहे. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह तरुणांची एक प्रचंड ताकद आहे. या संघटनेचा उपयोग करत जिल्ह्यात गावागावात शाखा उभा करून युवक संघटना आणखी मजबूत करणार असे ते म्हणाले. युवा कार्यकर्त्यांनी या शाखांच्या माध्यामातून सामान्य माणसांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

या प्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, माजी अध्यक्ष व जि.प.सदस्य शरदभाऊ लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तासगावचे सुरेशभाऊ पाटील, कवठेमहांकाळच्या अनिता सगरे, ताजुद्दीन तांबोळी, विद्यार्थी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील जाधव व युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख