राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे राज्यव्यापी परिवर्तन यात्रेचे आयोजन करणार - संग्राम कोते पाटील

25 May 2017 , 09:20:08 PM

भाजप सरकारने गेल्या अडीच वर्षांत काहीच काम केलेले नाही. निवडणुकांच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तताही त्यांनी केली नाही. राज्य सरकारच्या या भोंगळ कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस दिवाळीनंतर राज्यव्यापी परिवर्तन यात्रेचे आयोजन करणार आहे. कार्यकर्त्यांनी परिवर्तन यात्रेसाठी तयार रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी संग्राम कोते पाटील राज्याचा दौरा करत आहेत. ते आता कोल्हापूरात पोहोचले असून पक्षाच्यावतीने मंगळवारी शहरात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की भाजपबद्दल लोकांच्या मनात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या असंतोषाला वाट करून देण्याचे काम युवकांच्या माध्यमातून झालं पाहिजे. या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून सरकारचा मुखवटा उतरवला जाईल. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपण सर्व ठिकाणच्या कार्यकारिणी बरखास्त केल्या आहेत. यापुढे संघटनेचे काम आक्रमकपणे करणाऱ्या कार्यकर्त्यांना पद दिले जाईल, असे ते म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, युवक प्रदेश उपाध्यक्ष आदिल फरास, जिल्हाध्यक्ष रोहित पाटील आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख