तूर खरेदी न करणारे सरकार शेतकऱ्यांना मातीत घालणारे – चित्रा वाघ

02 May 2017 , 08:24:41 PM

हजारो शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर खरेदीविना पडून असल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांची तूर विकत घेतली जात नाही म्हणून सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुंबई येथील जिल्हाधिकारी कार्यलयावर धडक दिली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

मागच्या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना तूर पेरण्याचे आवाहन केले. त्यानंतर तूरीचे भरघोस पिक घेतले गेले, मात्र आता सरकार तूरच खरेदी करत नाही. ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे, अशी खंत चित्रा वाघ यांनी व्यक्त केली. हे सरकार शेतकऱ्यांना मातीत घालण्यास निघाले आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल न करता सरसकट तूर विकत घ्यावी, अशी मागणी उपस्थित आंदोलकांनी केली.

संबंधित लेख