सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळेच तुर उत्पादक शेतकऱ्यांचे हाल - धनंजय मुंडे

25 Apr 2017 , 06:44:55 PM

संपूर्ण तुर खरेदी करून हमीभाव व पाचशे रूपये बोनस देण्याची मागणी

नाफेडचे तुर खरेदी केंद्र बंद झाल्याने राज्यातील लाखो क्विंटल तुर खरेदी केंद्रावर पडून आहे. तुरीची खरेदी केली जात नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत असून ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा उद्रेक पाहण्यास मिळत आहे. राज्यातील तुरीचा प्रश्न गंभीर बनला असताना सरकार मात्र कोणतीच उपाययोजना करीत नसल्याबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या या नियोजनशून्य कारभारावर तीव्र शब्दात टीका केली. यावर्षी पीक पेरणी मोठ्या प्रमाणावर झाला. चांगला पाऊस झाल्याने तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढणार याची सरकारला जाणीव होती. तरीही सरकारने यासंबंधी कोणतेही नियोजन केले नाही. खरेदी केंद्रावर तुर खरेदी करण्यासाठी बारदाने उपलब्ध नाहीत आणि खरेदी केलेले तुर साठवण्यासाठी गोडाऊन्सही नाहीत. त्यातच लाखो क्विंटल तुर खरेदीकेंद्रांवर पडून असतांनाच २२ एप्रिल पासून खरेदी केंद्रेही बंद करण्यात आली. उत्पादन वाढूनही खरेदीचे नियोजन करण्याऐवजी सरकार झोपले होते काय? असा सवाल उपस्थित करतांनाच शेजारील कर्नाटक राज्य त्यांच्या राज्यातील तुरीला हमीभाव अधिक पाचशे रूपये बोनस देत असतांना महाराष्ट्रासारख्या राज्याला खरेदी ही करता येऊ नये, हे दुर्दैवी असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. राज्यात ११ कोटी ७१ लाख तुर उत्पादन झाले असतांना सरकारने केवळ उत्पादनाच्या एक टक्काही खरेदी केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. संपूर्ण तुरीची खरेदी करून हमीभाव व पाचशे रूपये क्विंटल बोनस द्यावा, अन्यथा राज्यातील शेतकऱ्यांचा संयम सुटल्याशिवाय राहणार नाही, तुर उत्पादक शेतकर्यांदच्याही आत्महत्या होतील आणि त्यास सरकारच जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित लेख