याचना नही रण होगा, संघर्ष बडा भीषण होगा

19 Apr 2017 , 06:15:20 PM

शहापूर येथील संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोप सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी, 'याचना नही रण होगा, संघर्ष बडा भीषण होगा', असा नारा देत शेतकऱ्यांसाठीचा हा लढा यापुढे अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट केले. कर्जमाफी झाली नाही तर सरकारला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा त्यांनी सभेत बोलताना दिला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. जितेंद्र आव्हाड, सुमन पाटील, विद्या चव्हाण, राजेश टोपे, हेमंत टकले, प्रकाश गजभिये, शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा, निरंजन डावखरे, अबू अझमी, जोगेंद्र कवाडे  आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.

राज्यातील शेतकरी अत्यंत हवालदिल झाला असून  शेतमालाला भाव नसल्याने आता तो संपावर निघाला आहे. जर असंच चालत राहिलं तर शहरातील लोकांना भाजीपाला, दूध व इतर साहित्य मिळेल का? गोहत्येबाबत कायदा केला जातो आणि शेतक-यांना साधी कर्जमाफी दिली जात नाही, मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या दुःखची जाणीव नाही का? असा संतप्त सवाल पवार यांनी केला. समृद्धी महामार्ग हे शेतकऱ्यांना भूमीहीन करण्याचं कारस्थान असून या मार्गासाठी सुपीक जमीन का नष्ट करायला निघालात ? असा प्रश्न त्यांनी विचारला. समृद्धी महामार्गाविरोधातील आंदोलनात जर पोलिसांनी बळाचा वापर केला तर स्थानिक शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, आम्ही तुमच्यासाठी लाठ्या-काठ्या खायला तयार आहोत, असा विश्वास पवार यांनी उपस्थितांना दिला. 

संबंधित लेख