संघर्षयात्रेची धुळे येथे जाहीर सभा

17 Apr 2017 , 08:54:53 PM

संघर्षयात्रेच्या धुळे येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना, तुरीला भाव घोषित करत सरकारने केवळ शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली, बारदाने खरेदी झाली नाही म्हणून नाफेडने तूर खरेदी बंद ठेवली आहे तसेच व्यापाऱ्यांच्या माध्यमातून दलाली वाढवली आहे, त्यामुळे हे सरकार म्हणजे फेकू सरकार असल्याची टीका केली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, आ. जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, भाई जगताप, प्रकाश गजभिये, अबू अझमी, प्रा. कवाडे, राहुल बोंद्रे, सुनील केदार उपस्थित होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, या लोकांना महामानव डॉ. आंबेडकर यांच्या नावाने फक्त राजकारण करणे माहीत आहे. इंदू मिल येथील स्मारकासाठी दिलेल्या जागी साधी वीटही हललेली नाही. फक्त गाजावाजा करत भूमिपूजन केलं. यांनी अनेक आश्वासने निवडणुकांच्या काळात दिली होती, मात्र अद्यापही त्याची पूर्तता केलेली नाही. यांची आश्वासने फसवी निघाली आहेत. आता यांना यांची जागा दाखवणे गरजेचे आहे आणि म्हणून ही संघर्षयात्रा काढली आहे, तेव्हा शेतकऱ्यांनी या लढ्याला एकजुटीने पाठिंबा द्या.

दरम्यान, लोकांचं लक्ष विचलीत करण्यासाठी सत्ताधारी रोज नवीन चेंडू टाकतात. आता गो-हत्येचा नवीन चेंडू टाकलाय, यातून धर्माच्या नावावर हिंसा केली जात आहे, अशी टीका यावेळी बोलताना आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. या महाराष्ट्राचा इतिहास जिजाऊ, सावित्रीमाईंचा आहे आणि या राज्यात जर लेकीबाळी आत्महत्या करत असतील तर ही पुरोगामी महाराष्ट्राची हार आहे, आपण वृत्तपत्रात रोज आत्महत्यांच्या बातम्या वाचतो पण सरकार ढिम्म हलायला तयार नाही, असा घणाघात आव्हाड यांनी केला.

संबंधित लेख