राज्यात अजून किती आत्महत्या झाल्यानंतर सरकारची सहनशीलता संपणार? – अजित पवार

17 Apr 2017 , 07:03:11 PM

नाशिकमधील मनमाड येथे रविवारी एका युवकाने आणि आज निबांयत येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अजून किती आत्महत्या झाल्यानंतर सरकारची सहनशीलता संपणार? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. ते आज मालेगाव येथील संघर्षयात्रेच्या जाहीर सभेत बोलत होते. नाशिकमधील शेतकऱ्यांची अवस्था आज फार वाईट झाली आहे, शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत आहेत. मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का? भाजपला शेतकऱ्यांचे हाल होत आहेत ते कळत नाही का? अशई खंत त्यांनी व्यक्त केली.

नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी विरोधकांनी केली असता सरकारने निर्लज्जपणे एक रुपये अनुदान दिलं. एक रुपयात चहा तरी मिळतो का, अशी उपरोधिक टीका पवार यांनी केली. शेतकरी समाधानी असेल तरच देशाची आर्थिक घडी सुरळीत राहील. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेस्तोवर संघर्षाची भूमिका कायम ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आ. राजेश टोपे, आ. जितेंद्र आव्हाड, आ.पंकज भुजबळ, भाई जगताप, गोपालदास अग्रवाल, बाळासाहेब थोरात, अबू आझमी, राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख