एका मुलीला आत्महत्या करावी लागते, ही आपल्या राज्यासाठी शोकांतिका - अजित पवार

15 Apr 2017 , 10:06:01 PM

राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारविरोधात पेटून उठायला हवं, जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत आता माघार नाही. राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं, त्याचीच प्रेरणा घेऊन ही संघर्षयात्रा सुरू झाली आहे, आता हा संघर्ष थांबणार नाही, असा एल्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला. सिंदखेडराजा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
 
संघर्ष यात्रेच्या द्वितीय सत्रातील पहिल्याच जाहीर सभेत बोलताना पवार यांनी सरकारवर टीकास्त्र डागले. या सरकारमधील लोकांचे काय सुरू आहे तेच कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोणी ढोल बडवतं का? पुण्यतिथीला उत्सव साजरा केला जातो का? सरकारला सत्तेची मस्ती चढली आहे, त्यांच्या डोळ्यात सत्तेची धुंदी आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
 
पुढे बोलताना पवार म्हणाले की, आतापर्यंत ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, याप्रसंगी राज्यसरकारची तिजोरी रिकामी करावी लागली तरी चालेल, पण शेतकरी मोडला नाही पाहिजे. आमचे सरकार असताना आम्ही कर्जमाफी करू शकलो तर हे सरकार का नाही? लग्नाचा खर्च आपल्या वडिलांना पेलवणार नाही, वडिलांवर लग्नाच्या कर्जाचा बोजा पडू नये म्हणून लातूरच्या शितल वायाळ या तरुणीने आत्महत्या केली. या राज्यात एका मुलीला आत्महत्या करावी लागते, ही आपल्या राज्यासाठी शोकांतिका आहे. अशा घटना ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या़च्या हृद्याला पाझर फुटत नाही का? त्या मुलीचा विचार करून तरी राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले. तसेच कर्जमाफी देणे जमत नसेल तर यांनी सत्तेतून पाय उतार व्हावं, आम्ही कर्जमाफी करून दाखवतो, असे आव्हानही त्यांनी दिले.
 
हे झोपेचे सोंग घेतलेले सरकार आहे, यांना शेतकऱ्यांचे अश्रू दिसत नाहीत. शेतकऱ्यांची थट्टा करण्याचे काम सध्या राज्यात सुरू असल्याची टीका माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी केली.
 
यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, आ.शशिकांत शिंदे, आ. राजेश टोपे, आ. जितेंद्र आव्हाड, प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार अबू अझमी, अब्दुल सत्तार, बुलडाणा नगराध्यक्ष नाझीर काजी उपस्थित होते. 

संबंधित लेख