शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय आता पर्याय नाही - अजित पवार

05 Apr 2017 , 06:24:44 PM

संघर्षयात्रेच्या सासवड येथील सभेत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय आता पर्याय नाही, अशी स्पष्टोक्ती केली. पदे येतील आणि जातील पण शेतकरी वाचावा म्हणून ही संघर्षयात्रा आहे. आता शेतकऱ्याचा आसूड काढावाच लागेल. काहीही करून कर्जमाफी मिळवायचीच, असा निर्धार पवार यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, आ. भास्कर जाधव,  आ. भाई जगताप, अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, कामगार नेते बाबा आढाव उपस्थित होते
 
यावेळी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अच्छे दिनच्या घोषणेची खिल्ली उडवली. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या घोषणा जनता आजही विसरू शकत नाही. अच्छे दिन गळ्यात अडकलेल्या हड्डी सारखे आहेत, असे खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते. अच्छे दिन हे फक्त फसवे आश्वासन होते अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्याने संप करायचा की नाही त्यावर विचार करू, पण कर्जमाफी न केल्यास शेतकरी एका हातात चाबूक अन दुसऱ्या हातात रूमने घेऊन सरकारविरुद्ध पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला.
 
दरम्यान, सभेपूर्वी विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन केलं. या वेळी उपस्थित नेत्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलानादरम्यान कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणा दिल्या तसेच सरकारची प्रेतयात्रा काढून, मुंडन करून निषेध केला.

संबंधित लेख