शेतकऱ्यांनो जीव देऊ नका, खा. शरद पवार यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन

05 Apr 2017 , 04:06:16 AM

शेतकऱ्यांनो जीव देऊ नका, खा. शरद पवार यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन
संषर्षयात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता पण एकजुटीने संघर्ष सुरूच राहणार असल्याचा शरद पवार यांचा दावा 
उत्तर प्रदेशात कर्जमाफी मग महाराष्ट्रात का नाही? - विरोधकांचा संतप्त सवाल

उत्तरप्रदेशमध्ये कर्जमाफी केली जाते पण महाराष्ट्रात कर्जमाफी केली जात नाही? असा जळजळीत सवाल करत शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्षयात्रेच्या पुढील टप्प्यातही विरोधक एकजुटीने संघर्ष करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यभरात आठवडाभर सुरू असलेल्या संघर्षयात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आज पनवेल येथे झाला. जाहीरसभेच्या माध्यामातून संघर्षयात्रेची सांगता झाली. या सभेत काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, डॉ. पतंगराव कदन, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, अबू आझमी, नितेश राणे, हर्षवर्धन पाटील, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड आणि विरोधी पक्षातील अन्य नेते मंडळी उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, राज्य सरकारने सत्तेत येताना अनेक आश्वासने दिली होती मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता यांनी केली नाही. कर्जमाफीही त्यातलेच एक आश्वासन होते. दिलेला शब्द न पाळण्याची या सरकारची रीत आहे. जोपर्यंत कर्जमाफी दिली जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले. देशातील २० राष्ट्रीयकृत बँकांचे मोठ्या लोकांना दिलेले कर्ज वसूल होणार नाही म्हणून ती रक्कम एनपीएमध्ये टाकली जाते पण शेतकऱ्यांचं काही हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जात नाही ही बाब दुर्दैवी आहे. युपीए सरकारच्या काळात आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची भूमिका घेतली होती. अशी भूमिका भाजपचे सरकार का घेऊ शकत नाही असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. आमदारांच्या निलंबना विषयी बोलताना पवार म्हणाले की शेतकऱ्यांच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या आमदारांना निलंबीत केले जाते. ही लोकशाही आहे का असा सवाल पवार त्यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संघर्षयात्रेत सामील झालेल्या सर्व आमदारांचे आभार मानले. तसेच कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असा इशारा सरकारला दिला.

संबंधित लेख