सरकारला वठणीवर आणण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही - अजित पवार

03 Apr 2017 , 07:34:53 PM

मोठमोठ्या उद्योगपतींना हजारो कोटींचे कर्ज हे सरकार माफ करीत असून, शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ करायला सरकारकडे पैसे नाहीत. सरकारने १९ आमदारांचे निलंबन केले, निलंबन करण्यापेक्षा विरोधातील विधिमंडळातील सर्व आमदार राजीनामे देतील, परंतु शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले. विरोधकांची संघर्षयात्रा रविवारी मोहोळ येथे पोहोचली, त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, आ. जितेंद्र आव्हाड, आ. जयकुमार गोरे, प्रणिती शिंदे, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, आ. संग्राम थोपटे, आ. कुणाल पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. राहुल बेंद्रे, आ. कांबळे, आ. भारत भालके, आ. सुनील केदार, माजी आ. दीपक साळुंखे उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, हे सरकार अत्यंत दळभद्री सरकार आहे. त्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांशी काहीच देणेघेणे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, मी फकीर आहे परंतु जनता फकीर नाही. शेतकऱ्यांना काहीच देण्याची दानत या सरकारमध्ये नाही. मराठा व धनगर समाजाला आरक्षण देतो असे म्हणाले होते, अद्याप आरक्षण मिळालेले नाही, त्यामुळे हे सरकार जातीयवादी असून या संघर्षयात्रेनंतरही सरकारला जाग नाही आली तर संपूर्ण राज्यात येणाऱ्या काळात चक्का जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हरितक्रांती, धवलक्रांतीने सुजलाम् सुफलाम् असणाऱ्या महाराष्ट्राची सहकार चळवळ मोडीत काढणाऱ्या या सरकारला वठणीवर आणण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

संबंधित लेख