सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले – अजित पवार

01 Apr 2017 , 12:33:25 AM

संघर्षयात्रा हिंगोली येथे पोहोचली असता स्थानिक शेतकऱ्यांशी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, अबू आझमी आणि विरोधी पक्षाचे इतर नेते उपस्थित होते. हिंगोली, माळेगाव, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल पडून आहे, त्यावर हे सरकार काहीच करत नाही. भाजपचे लोक विरोधात असताना शेतमालाला भाव द्या, अशी मागणी करत होते. आता यांचे सरकार आहे, मग का शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला जात नाही? असा प्रश्न अजित पवार यांनी यावेळी केला.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांमध्ये या सरकारप्रती एक रोष आहे. या रोषाला कुठे तरी वाचा फुटायला हवी म्हणून या संघर्षयात्रेचे आयोजन केले गेले आहे. आमचे सरकार असते तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता या संकटसमयी आम्ही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेलो असतो. मात्र आज शेतकऱ्याला मदत मिळत नाही. हे सरकार झोपेचं सोंग घेतल्यासारखं वागत आहे. यांना सर्व दिसतं तरी आंधळ्याचं सोंग यांनी घेतलं आहे. मुळात शेतकऱ्याला मदतच करायची नाही, हे यांचे धोरण आहे. सरकारला सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली असून या परिस्थितीत ही संघर्षयात्रा आपल्यासाठी फार महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन पवार यांनी केले. 

संबंधित लेख