तळेगाव, तिवसा, चांदूर रेल्वे येथे संघर्षयात्रेच्या जाहीर सभा

01 Apr 2017 , 12:25:10 AM

अमरावती येथे गुरूवारी संघर्षयात्रा पोहोचली असता तळेगाव, तिवसा, चांदूर रेल्वे येथे जाहीर सभा घेण्यात आल्या. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, प्रकाश गजभिये, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, नितेश राणे, अबू आझमी उपस्थित होते.

सभेत शशिकांत शिंदे यांनी सरकारवर सामान्य माणूस, कष्टकरी, गरीब हे सर्वच समाजघटक नाराज असल्याचे प्रतिपादन केले. सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली तर मुख्यमंत्री आत्महत्या होणार नाहीत याची हमी द्या म्हणतात. मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारण्यास लाज कशी वाटत नाही? सरकारने आमदारांना निलंबीत केले तरी आम्ही जनतेच्या विधानसभेत तुम्हाला प्रश्न विचारू. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत आम्ही सत्ताधाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही. हे सरकार अदानी-अंबानीचं सरकार आहे. आता संघर्षाला सुरुवात झाली आहे. मातीतून सोनं पिकवणारे हात सरकारचा कोळसा केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा शिंदे यांनी दिला.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पूर्वी देशात असेच अराजक माजले असता इंदिरा गांधींनी विदर्भातूनच संघर्षयात्रा काढली होती आणि देशात बदल घडला. जेव्हा जेव्हा विदर्भातून यात्रा निघाल्या तेव्हा तेव्हा बदल घडला आहे. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रात येणाऱ्या काळात बदल घडेल, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख