शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांचे विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

09 Mar 2017 , 07:25:45 PM

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सलग दुसऱ्या दिवशीही अधिवेशनात गाजत आहे. सभागृह सुरू होण्याआधी विरोधकांनी विधान भवनाच्या आवारात घोषणाबाजी करून कर्जमाफीची मागणी केली. विधानसभेतही विरोधकांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. विरोधकांच्या गदारेळामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 
 अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने लावून धरली आहे. कर्जमाफी केली तर बँकांना फायदा होतो असा युक्तीवाद सरकारतर्फे केला जातो मात्र हे सरकारचे वेळकाढू धोरण आहे. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली पाहिजे. घोषणा होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विधिमंडळ पक्षनेते अजित पवार  यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिला. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक सभागृहात आंदोलन करत असताना सरकारमधील मंडळींना शेतकऱ्यांचा पुळका आला व तेदेखील वेलमध्ये उतरले. शेतकऱ्यांसाठी सर्वपक्षीय सदस्य एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे, पण निव्वळ दिखावा नको. त्यामुळे दोन्ही सभागृहांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तयारी दाखवत मंजुरी द्यावी. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी तशी घोषणा सभागृहात करावी, असे अजित पवार म्हणाले.

संबंधित लेख