म्हैसाळ येथील स्त्रीभृणहत्येप्रकरणी संबंधित मंत्र्यांनी त्वरीत राजीनामे द्यावे - जयंत पाटील

07 Mar 2017 , 08:52:54 PM

म्हैसाळ येथील स्त्रीभृणहत्येप्रकरणी संबंधित मंत्र्यांनी त्वरीत राजीनामे द्यावे - जयंत पाटील

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील स्त्रीभृणहत्येचे धक्कादायक प्रकरण पुढे आले आहे. राज्य सरकारने आरोपींवर तातडीने कारवाई करायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केली. या प्रकरणात डॉक्टर्सचे एक रॅकेट गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. एका महिलेचा मृत्यू झाला तेव्हा हे रॅकेट उघडे पडले. यावरून असे लक्षात येते की राज्यातील स्त्रीभृण हत्या थांबविण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री, महिला व बाल कल्याण मंत्री आणि राज्याचे गृहमंत्री सपशेल अपयशी ठरले आहेत, अशी घणाघाती टीका यावेळी पाटील यांनी केली. संबंधित मंत्र्यांनी त्वरीत राजीनामे द्यावेत अशी मागणी त्यांनी केली. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणे निषेधार्थ आहे. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला.
विरोधकांच्या प्रश्नांचे उत्तरे देण्याचे तारतम्य सरकारकडे नाही
विधीमंडळाच्या कामकाजात आज तीन लक्षवेधी सुचना मांडल्या जाणार होत्या मात्र लक्षवेधी सुचनांचे उत्तर देण्याचे तारतम्य सरकारकडून दाखवले जात नाही. दोन प्रश्नांची उत्तरे न आल्यामुळे सभागृहाचे कामकाज ठप्प झाले. अध्यक्षांचे निर्देश मंत्र्यांकडून पाळले जात नाहीत ही गंभीर बाब असून याच्या निषेधार्थ विरोधीपक्षाने सभात्याग केल्याचे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

संबंधित लेख