लोकशाहीत यश व अपयश येत असते. पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्ष संघटनेतील सुधारणांवर भर देऊ – शरद पवार

07 Mar 2017 , 07:30:11 PM


महाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षाची भूमिका मांडली.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीत काहींना यश आले तर काहींना पराभव. लोकशाहीत यश अपयश हे येत असते असे म्हणत शरद पवार यांनी पक्ष पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या काळात नेतृत्व कमी पडल्याचे मान्य करून ते म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अपयश आले. अतिशय चांगली कामे करूनही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला यश प्राप्त करता आले नाही. त्यामुळे आम्हाला आणखी काही सुधारणा करता येईल का, यावर आम्ही लक्ष देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दुसऱ्या क्रमांकावर आहे. मतांच्या गणितात भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अगदी थोड्या फरकाने मागे आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही असे यश मिळणे म्हणजे लोकांचा आमच्यावरचा विश्वास आहे असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पैशांच्या जोरावर निवडणूक न लढवता कामांच्या जोरावर निवडणूक लढवली आहे. सत्ताधारी पक्षाने मोठ्या प्रमाणात सत्तेचा आणि साधन सामग्रीचा उपयोग केला. सत्ताधाऱ्यांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्तेचा उपयोग करूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे यश मिळालं. या विजयाचे श्रेय त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिले. पराभव आल्याने खचून जायचे नाही, पुन्हा जिद्दीने उठायचे असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याकडे भर द्यावे असं त्यांनी सुचवले.
ईव्हीएम मशीनमध्ये काही घोटाळा आहे का, अशा अर्थांच्या प्रश्नांवर शरद पवार म्हणाले की, ईव्हीएम मशीन हे पराभवाचे कारण असू शकत नाही. पराभव हा पराभव असतो, आम्ही जिथे कमी पडलो त्या चुका येत्या काळात दुरुस्त करू. ईव्हीएम मशीन घोटाळ्याविषयींच्या अफवा त्यांनी नाकारल्या. या निवडणुकांमध्ये नोटाबंदीचा असा प्रभाव झाला की भाजप सोडून बाकी कोणत्याच पक्षांकडे पैसे नव्हते असे सूचकरीत्या सांगत त्यांनी भाजपावर टीका केली.
आर्मीच्या पेपरफुटी प्रकरणाबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी सिस्टीमला जबाबदार धरत हा भारत सरकार आणि आर्मीचा अपमान असल्याचे वक्तव्य केले.
भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या वक्तव्याबाबतच्या प्रश्नांवर ते म्हणाले की हे वक्तव्य बेजबाबदार असून अशा व्यक्तींना लोकशाहीच्या मंदिरात बसू देऊ नये अशी मागणी जर धनंजय मुंडे यांनी केली असेल तर ती योग्यच आहे.
मराठा, धनगर, मुस्लीम समाज यांच्या आरक्षणाविषयीचे प्रश्न पत्रकारांनी विचारले असता पवार साहेबांनी खंत व्यक्त कत सांगितले की, आरक्षाणाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देणाऱ्या भाजपने अडीच वर्षात काहीच केले नाही. फडणवीस यांचे आश्वासन ग्रामीण भागातल्या म्हणीप्रमाणे ‘लबाडाच्या घरचे आवतान ठरले’ असा टोलाही त्यांनी लगावला.
या पत्रकार परिषदेला ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे, माजी खासदार संजीव नाईक, व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख