मुंबई महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांची मुंबई येथे पत्रकार परिषद

18 Feb 2017 , 08:20:22 PM

मुंबई महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांचा परामर्श घेतला. यावेळी राज्यातील मध्यावधी निवडणुकांच्या शक्यतांबद्दल आणि त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत पत्रकारांनी वारंवार विचारणा केली असता पवारसाहेबांनी त्यांच्या तिरकस आणि मिश्किल शैलीत सांगितले की, आम्ही सरकारला पाठिंबा देणार नाही, हे लिखीत स्वरूपात द्यायला तयार आहोत, या लेखी निवेदनाची प्रत राज्यपालांनादेखील द्यायला तयार आहोत, मात्र शिवसेनेने देखील आपण सरकारला पाठिंबा देणार नाही, असे लिखीत स्वरुपात जाहीर करावे. वाटल्यास शिवसेनेने हे पत्र मीडियाकडे द्यावे.
यावेळी नोटाबंदी तसेच इतर विषयांवरही पवार यांनी भाष्य केले. नोटाबंदीमुळे सामान्य माणसाचे अर्थकारण संकटात आले आहे. सुरूवातीला अंदाज आला नाही, तसेच काळा पैसा बाहेर येईल म्हणून लोकांनी पाठिंबा दिला. पण जसे जसे तथ्य बाहेर येते आहे तसा लोकांचा राग वाढत चालला आहे. नोटाबंदीचा कार्यक्रम राबवल्यानंतर पहिल्या ३० दिवसात लघु उद्योग आणि कापड उद्योगावर त्याचा परिणाम झालेला आहे. रोजगार बंद पडले आहेत. सरकार देशातील लोकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा यातना वाढवण्याचे काम करत आहे. हा विषय निवडणुकीच्या प्रचारातून मांडून या माध्यमातून जनमत तयार करण्याचे काम आम्ही करत आहोत, असे पवार यांनी सांगितले.
भाजपचे अनेक लोक खासगीत मा. अटलबिहारी वाजपेयी , मा. लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे नेतृत्व आता राहिले नसल्याची खंत बोलून दाखवत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी भाजप मोठ्या प्रमाणावर सत्ता आणि पैशाचा वापर करत आहे. पारदर्शकतेबद्दल बोलणाऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक कशी केली, याचे उत्तर द्यावे लागेल, असे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच कोणत्याही वृत्तपत्रावर बंदीची मागणी करणे हे लोकशाहीच्या विरोधातील आहे. सत्ताधारी पक्ष अशी मागणी करते, याचे आश्चर्य वाटते. सत्ता किती लवकर डोक्यात जाते याचे हे उदाहरण आहे, अशी टीका पवार यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेस मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, कोषाध्यक्ष आ.हेमंत टकले, संजय तटकरे, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

संबंधित लेख