निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पार्लमेंट्री बोर्डची बैठक

20 Jan 2017 , 12:22:19 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पार्लमेंट्री बोर्डची बैठक आज पार पडली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मनपा निवडणुकांबाबत चर्चा करून जिल्हानिहाय राजकीय परिस्थितींचा आढावा घेण्यात आला. समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नेहमीची भूमिका आहे. काही जिल्ह्यात आघाडी करण्याबाबतची यशस्वी चर्चा सुरू असून येत्या दोन-तीन दिवसात त्याबाबतची भूमिका पक्ष जाहीर करेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसकडून आघाडीचा प्रस्ताव आला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःहून आघाडीबाबत विचारणा करेल असेही तटकरे म्हणाले. मुंबई मनपा निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या यादीबाबत आज गटनेते जयंत पाटील , मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर, यांच्यात चर्चा झाली. मुंबईत काही ठिकाणी उमेदवारांमध्ये चुरस आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मुंबईतील दुसऱ्या यादीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली. या पत्रकार परिषदेस मुख्य प्रवक्ते नवाब मलिक व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ उपस्थित होत्या.


संबंधित लेख