पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

16 Jan 2017 , 06:44:00 PM

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काची रब्बी हंगाम २०१५ मधील पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक आहे. पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर शासनस्तरावर सदर रब्बी पीक विम्याबाबत कृषी प्रधान सचिव श्री.बिजयकुमार व अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभाग डी.के.जैन यांच्याकडून दोन दिवसात तातडीने रब्बी पीक विम्यापोटी राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम अदा होणार असल्याचे कळविण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा व त्यांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आक्रमक पवित्रा पाहता शासन दरबारी शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीची दखल घेणे भाग पडले. हे एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वेळोवेळी करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनांचे यश आहे.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शासनाकडून अद्याप शेती संबंधित विविध अनुदानांचे ९३७ कोटी रुपये रक्कम येणे बाकी आहे. सदर बाकी रक्कम देखील तातडीने अदा करावी अन्यथा उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संयम सुटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

संबंधित लेख