सटाणा पालिकेत राष्ट्रवादीची हॅट्रीक होणार - सुनील तटकरे

18 Nov 2016 , 05:07:03 PM

सटाणा नगरपालिकेच्या दहा वर्षात झालेल्या विकास कामांवर जनता पुन्हा पक्षाच्या हातात सत्ता देईल असा विश्वास व्यक्त करून हॅट्रीक झाल्यास शहराचा कायापालट करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे  यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगारआमदार दिपिका चव्हाणमाजी आमदार संजय चव्हाणकाका रौंदाळराष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मौलाना सय्यदतालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ आज येथील पोलीस चौकीजवळ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी तटकरे बोलत होते. तटकरे यांनी आपल्या भाषणात कुणावर टीका टिपणी न करता गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादीच्या माध्यमातून तसेच संजय चव्हाण यांच्या सारखे सक्षम नेतृत्व तालुक्याला लाभल्यामुळे शहराचे रूपडे बदलत असल्याचे सांगितले. काका रौंदळ यांच्यासारख्या संपूर्ण शहराला मोफत पाणी वाटप करणाऱ्या सेवाभावी वृत्तीची उमेद असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला या सटाणा शहराची उमेदवारी पक्षाने दिली असून सटाणा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व उद्याचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी काकांना नगराध्यक्ष पदाची संधी द्याते संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाहीत,असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

स्मार्ट सिटी बनविण्याचा आपला संकल्प असून शहरवासीयांना आपल्या नेतृत्वावर विश्र्वास आहे. त्यामुळे येत्या २८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर रायगड किल्ल्यावर नक्कीच ऐकायला मिळेल असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची कमी जाणवत असल्याचे सांगून त्यांच्यामुळेच जिल्ह्याचा आणि सटाण्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला. पालिकेच्या सक्षम नेतृत्वामुळे स्वच्छता अभियानात दोन वेळा प्रथम क्रमांकाचे पारितेषिक मिळाले. थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका रौंदाळ हे पाणीदार नेतृत्व आहे. निस्वार्थी व्यक्तिमत्व असलेल्या रौंदाळ यांच्यासह पक्षाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

संबंधित लेख