शुल्कवाढीविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा आवाज

28 Oct 2016 , 04:59:41 PM

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने अचानक केलेली शुल्कवाढ कमी करण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांची बुधवारी भेट घेतली होती. या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती विद्यार्थ्यांनी पवार यांना केली. या शुल्कवाढीविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आधीच आवाज उठवला आहे. रा.वि.काँचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील आणि राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बाहेर गेट बंद आंदोलन करण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या आंदोलनाची दखल घेत विद्यापीठाने आता याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. एमएससी इन टुरिझम, बॅचरल ऑफ फाइन आर्ट्स, एमबीए इन फॅशन डिझाईन, बीएससी ऑटोमोटीव टेक्निक, बीएससी हॉटेल मॅनेजमेंट आणि इतर काही अभ्यासक्रमांचे शुल्क विद्यापीठाने एकरकमी ४० हजारांहून २० ते २२ हजारांपर्यंत खाली आणले असल्याची माहिती संग्राम कोते पाटील यांनी दिली.
विद्यापीठाने एकतर्फी निर्णय घेऊन २७ शैक्षणिक अभ्यासक्रमांचे शुल्क ४० हजार रुपये सक्तीचे केले होते. इतर मुक्त विद्यापीठात हेच शुल्क सहा ते आठ हजार इतकेच आहे. राज्यातील जवळपास सहा लाख विद्यार्थी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्यामुळेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने हा निर्णय मागे घेण्यास विद्यापीठास भाग पाडले असल्याचेही संग्राम कोते पाटील यांनी सांगितले.

संबंधित लेख