भाजप कार्यकर्त्यांचा डाव उधळला

30 Sep 2016 , 04:48:08 PM

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर निदर्शने करण्यासाठी येत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने केली. या आंदोलनावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या चित्रा वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे,मुंबई युवती अध्यक्ष अदिती नलावडे, प्रदेश सरचिटणीस उमेश पाटील, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या तापट स्वभावावरुन बुधवारी टिप्पणी केली होती. त्याविरोधात भाजपच्या महिला कार्यकर्त्या राष्ट्रवादी कार्यालयासमोर येऊन आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना मिळताच, खा.सुप्रिया सुळे यांच्या समर्थनात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यालयाबाहेर जमा झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहताच भाजपा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाकडे न फिरकता त्यांचे नियोजित आंदोलन आटोपते घेतले. भाजपचे कार्यकर्ते पळकुटे आहेत, त्यांच्यात थेट उत्तर देण्याची हिम्मत नाही अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

संबंधित लेख