हे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे – छगन भुजबळ

20 Nov 2015 , 05:28:39 PM

सरकारमधील नेता दलितांना कुत्रा असे संबोधतो, या विचारांनी देश पुढे जाईल का, असा धारदार सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईच्या वरळीतील जांबोरी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपस्थित केला. अल्पसंख्याक, दलितांवर अत्याचार वाढायला लागले आहेत असून हरयाणाची घटना अंगावर काटा आणणारी आहे, असेही ते म्हणाले. देशात दहशतीचे वातावरण पसरले असून सिनेनिर्माते, साहित्यिक, शास्त्रज्ञ सगळेच भयाच्या सावटाखाली वावरत आहेत, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या एक वर्षाच्या गैरकारभाराचा पंचनामा करणारी भव्य सभा आज आयोजित करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत रिपाई, मनसे आणि विविध संघटनांतील कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच राज्य सरकारच्या वर्षभरातील अपयशाचा पंचनामा करणाऱ्या 'एक वर्ष अपयशाचं' या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपल्या भाषणात घराघरात जाऊन राष्ट्रवादी वाढवणार असल्याचा नारा दिला. डांसबारवरील उठलेल्या बंदी विरोधात आवाज उठवताना मुंबईमध्ये पुन्हा छमछम सुरू होऊ देणार नाही, अशी घोषणाही त्यांनी केली.

मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी 'देशातल्या जनतेची बात ऐका..स्वतःच्या मन की बात आम्हाला ऐकवू नका', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. तुमची ५६ इंचाची छाती दादरी, हरयाणा सारख्या घटनेच्यावेळी का आक्रसते, असा सवालही त्यांनी पंतप्रधानांना केला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लढलेल्या गिरणी कामगारांना घरे न देता हे सरकार बिल्डर आणि भांडवलदारांचा फायदा करणार असाल तर आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू असा इशारा यावेळी अहिर यांनी दिला.
बिहारच्या निकालाने भाजपावर ऐन दिवाळीत शिमगा करायची वेळ येणार आहे, असा अंदाज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. मुंबईकरांना मुंबई बाहेर जाईपर्यंत कधीही टोल द्यावा लागत नव्हता पण पेट्रोल-डिझेल वर २ रु कर लावून मुंबईकरांवर हा कराचा टोल लावला आहे, असेही ते म्हणाले.

छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत सरकारचा खरपूस समाचार घेतला. कोणाशी लग्न करायचे, किती अपत्यं जन्माला घालावी, कसे कपडे घालायचे, काय खायचे, साहत्यिकांनी काय लिहायचे, काय बोलायचे, व्हॉट्सअपवर काय टाइप करून पाठवायचे हे आता सरकारच सांगणार आणि नाही ऐकलं तर तो देशद्रोह ठरणार!, अशा सरकारच्या भूमिकेबद्दल भुजबळ यांनी संताप व्यक्त केला.

"आमच्यावेळी एक आत्महत्या झाली की लगेच ३०२ टाका म्हणून विरोधक मागे लागायते. आता १ वर्षात चार हजार आत्महत्या झाल्या तेव्हा काय करताय तुम्ही?" असा प्रश्न भुजबळ यांनी केला. नरेंद्र भाई आणि देवेंद्र भाई परदेश फिरून एवढे पैसे आले, तेवढे पैसे आले सांगत आहेत पण प्रत्यक्षात इथलं सगळं गुजरातला चाललं आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री इथे येऊन उद्योजकांना 'आवजो' म्हणतात, हे काय चाललंय, असा सवाल त्यांना उपस्थित केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत पंधरा वर्षांनंतर मतभेद झाले पण भाजप-शिवसेनेचे मतभेद पंधरा महिन्यांच्या आतच सुरू झाले आहेत, याबाबत त्यांना आश्चर्य व्यक्त केले. साहित्यिक प्रतिक्रियेतून निषेध नोंदवत आहेत पण हे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. साहित्यिकांना लिखाण बंद करायला सांगितले जात आहे, अशा शब्दांत त्यांना आपली नाराजी व्यक्त केली.

राज्यभरातून आलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांच्या मोठ्या उपस्थितीत ही भव्य सभा झाली.

संबंधित लेख