राज्यात इतकी अस्वस्थता असताना सरकारला झोप येतेच कशी? –सुप्रिया सुळे

26 Sep 2016 , 05:32:38 PM

सध्या राज्यभरात मराठा समाजाचे मोर्चे हा चर्चेचा विषय ठरत आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहे. प्रत्येक दिवशी हा आकडा वाढतच आहे. या मराठा मुक क्रांती मोर्चाच्या निमित्ताने आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. मुलाखतीदरम्यान सुळे यांनी राज्य सरकार तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर सडकून टीकाकेली. लाखोंच्या संख्येने मुक मोर्चे निघत आहेत, राज्यात इतकी अस्वस्थता असताना या सरकारला झोप येतेच कशी? असा सडेतोड सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. कोपर्डी बलात्कारप्रकरणी दोन महिन्यांच्यावर कालावधी उलटूनही अद्याप चार्जशीट दाखल झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी महिन्याभराच्या आत चार्जशीट दाखल करण्याचे आश्वासन दिले होते तरी चार्जशीट का दाखल झाली? असा प्रश्नही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केला. राज्यात इतके अस्वस्थ वातावरण असतानाही मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर निघून जातात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी अॅट्रॉसिटीच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवावे अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यावर उद्धव ठाकरे याबाबत मुख्यमंत्र्यांना फोन का करत नाही असा टोलाही सुळे यांनी ठाकरे यांना लगावला.
मराठा मोर्चाचे नेतृत्व महिला आणि तरुणी करत आहे त्यामुळे राज्यात सुरू असलेले मराठा मोर्च्यांचे सत्र परिवर्तनाची नांदी ठरू शकते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच २५ सप्टेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या मराठा मुक क्रांती मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी सुळे यांनी दिली.

संबंधित लेख