आगामी निवडणुकांमध्ये मतदारांनी राज्य सरकारला धडा शिकवावा – सुनील तटकरे

23 Sep 2016 , 05:12:52 PM

केंद्र आणि राज्यामध्ये 'अच्छे दिन'च्या नावाखाली आश्वासनांची खैरात करुन सत्ता मिळवणाऱ्या सरकारला मतदारांनीच धडा शिकवावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी लातूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केले. सत्तेवर येताना केंद्र आणि राज्य सरकारने 'अच्छे दिन'चे स्वप्न जनतेला दाखवले. आश्वा्सनांची खैरात करत केंद्र आणि राज्यात सत्ता आणली. मात्र, त्यानंतर कुठल्याही आश्वासनाची पूर्तता सरकारला करता आली नाही. शिवाय शेतकरी, बेरोजगार आणि तरुणांच्या हाताला कामही देता आले नाही, अशी टीका तटकरे यांनी सत्तारुढ भाजप सरकारवर केली. सत्तेवर येण्यासाठी सरकारने मतदारांची फसवणूकच केली. या सरकारच्या विरोधातील संताप मतांमध्ये कसा परिवर्तीत करता येईल, यादृष्टीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे, सरकारला उघडे पाडण्यासाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या निमित्ताने प्रत्येक कार्यकर्त्याने सरकारच्या विरोधातील भावना मतांमध्ये परिवर्तीत होण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी व्यासपीठावर प्रभारी जीवनराव गोरे, जिल्हा निरीक्षक हरिहर भोसीकर, आमदार विक्रम काळे, प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे,जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहराध्यक्ष मकरंद सावे, बसवराज पाटील नागराळकर, माजी जिल्हाध्यक्ष एन. बी. शेख, बबन भोसले, पप्पू कुलकर्णी, प्रशांत पाटील, राजा मणियार, शहर जिल्हाध्यक्ष रेखा कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख