जनता म्हणतेय, “नही चाहिए आपके अच्छे दिन, पुराने दिन लौटा दो” – मा. शरद पवार

20 Nov 2015 , 04:35:15 PM

सुमारे ५.४० लाख टन डाळ असलेली ६ जहाजे मुंबईच्या बंदरावर उभी, मात्र डाळ ऊतरवू दिली जात नाही, पवार यांनी केला खुलासा

डाळींच्या व्यापाऱ्यांचे संघटन गेले तीन दिवस मला भेटत आहे. डाळीचे भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी ते दर्शवत आहेत, मात्र केंद्र आणि राज्य सरकारचे यासाठी सहकार्य मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे, असा खुलासा मा. शरद पवार यांनी आज मुंबईतील सभेला संबोधित करताना केला. राज्य सरकारच्या गेल्या वर्षभरातील अपयशाचा पंचनामा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुंबईतील वरळी येथे जाहीर सभा घेऊन केला. त्यावेळी ते बोलत होते.

आपल्याला आयात कराव्या लागणाऱ्या डाळीतील सुमारे ५.४० लाख टन डाळ असलेली सहा जहाजे मुंबईच्या बंदरावर उभी आहेत पण त्यांना डाळ ऊतरवू दिली जात नाही आहे. सरकारच्या अडेल धोरणांमुळेच हे होत आहे, अशी माहिती या व्यापाऱ्यांनी आपल्याला दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढत आहेत. मुंबईत कांदा मिळत नाही आणि नाशिकच्या जिरायती शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही. म्हणजे मध्यस्थांच्या फायद्यासाठी सरकार काम करत आहे. जनता म्हणतेय, “नही चाहिए मुझे आपके अच्छे दिन मुझे मेरे पुराने दिन लौटा दो”,अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या कुचकामीपणाला टोला लगावला.

आमचे सरकार असताना शेतकऱ्यांचे दुःख जाणून आम्ही कर्जमाफी केली. पण सत्ताबदल झाल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये विलक्षण वाढ झाली आहे. आमच्या वेळी नवी उमेद मिळालेला शेतकरी आज नाउमेद झाला आहे, याबाबत पवार यांनी खंत व्यक्त केली.

आज वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना स्मरण करण्याचा दिवस आहे. पण सर्व वर्तमानपत्रांत फक्त सरदारांचीच जाहिरात आहे. इंदिराजींचा कुठेच उल्लेख नाही. सरकारने सरदार पटेल यांचा आदर केला ही चांगलीच बाब आहे. त्यांनी गांधी, नेहरूंना स्वातंत्र्यसंग्रामात मोलाची साथ दिली. ते काँग्रेसच्या विचारांचे होते. भाजपच्या विचारांचे कधीही नव्हते. मोदीजींना माझं सांगणं आहे. तुम्ही संघाचे आहेत. संघाचा आणि देशाचा इतिहास नीट बघा. सरदार पटेल काँग्रेसचे गृहमंत्री असताना त्यांनी संघावर बंदी आणली होती. ज्या सरदार पटेलांनी तुमच्या विचारसरणीवर बंदी घातली, त्यांच्याच नावाचा वापर तुम्ही लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी करू नका. देशाच्या इतिहासाची चिरफाड करणारे एक दिवस देशाच्या ऐक्याला बाधा पोहोचवतील याबाबत माझ्या मनात शंका नाही, असे पवार म्हणाले.

समाजात कोणी दहशत पसरवत असेल तर त्यांना रोखणे आणि लहान घटकांना संरक्षण देण्याचे काम राज्यकर्त्यांचे असते. पण हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणतात की आमचं एकायचं नसेल तर देश सोडा, हा देश तुमच्या बापजाद्यांचा आहे का?, असा धारदार सवाल त्यांनी सरकारला विचारला. लोकांनी तुम्हाला काम करण्याची संधी दिलेली आहे. त्यांचा संयम तोडू नका. मी मोदीजींना आठवण करून देऊ इच्छितो, दिल्लीच्या लोकसभेच्या निवडणूकीत जनतेने भाजपला निवडून आणले मात्र विधानसभेच्या निवडणूकीत त्यांना त्यांची जागा दाखवली होती. देशातील नागरिक जागा झाला की केवढीही मोठी सत्ता असली तरी ती उलथवून टाकण्याची तिच्यात ताकद त्यांना गांधी, नेहरू, आंबेडकर यांनी बहाल केलेली आहे, असा इशारा शरद पवार यांनी सभेत बोलताना दिला.

तसेच, डॉ. आंबेडकरांचे स्मारक हे लोकशाहीचा आणि संविधानाचा आदर करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांच्या स्मारकाच्या उद्घाटनाला पंतप्रधान येत असतील तर त्याला आमचा विरोध नाही. पण तुम्ही सत्ताधारी मित्रपक्षालाही बोलवू शकला नाहीत. यावरून तुमच्या विचारांतील संकुचितता जनतेला समजली, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे गाव असलेले नागपूर आज गुन्हेगारीचे केंद्रबिंदू झाले आहे. त्यामुळे मला वाटतं या सरकारने पंचनामा करण्यासारखेही काही काम केलेले नाही. आणि जे केलेलं आहे ते फक्त उध्वस्त करणारं आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी सरकारचे मूल्यमापन केले.
हा महाराष्ट्र फक्त शाहू, फुले, आंबेडकर आणि नेहरू, गांधी यांच्या विचारांनीच चालेल. नाकर्त्या सरकार विरोधातील आपली लढाई आता संपेपर्यंत थांबायचं नाही, असे आवाहन त्यांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांना केले.⁠⁠

संबंधित लेख