स्व. शरद राव यांच्या शोकसभेला यावे लागेल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते – शरद पवार

21 Sep 2016 , 06:54:06 PM

कामगार नेते स्व. शरद राव यांच्या शोकसभेला यावे लागेल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. शरद राव यांनी संपूर्ण आयुष्य कामगार वर्गासाठी संघर्ष केला, ते झुंजार नेते म्हणून ओळखले जायचे. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांचे संरक्षण करण्यासाठी राव यांनी आयुष्यभर कामगारांच्या बाजूने भूमिका घेतली, अनेक लढे दिले. त्या लढ्यांमध्ये कामगारांच्या पदरात यश पडावे याची काळजी त्यांनी सतत घेतली. अशा या लढवय्या नेत्याची कॅन्सरशी झुंज मात्र अपयशी ठरली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कामगार नेते शरद रावांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. मंगळवारी मुंबईत आयोजित शरद राव यांच्या शोकसभेस उपस्थित राहून पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी शरद राव यांच्या स्मृतींना पवारांनी उजाळा दिला.
शरद राव यांनी आपलं आयुष्यच कष्टकऱ्यांसाठी झोकून दिलं. कॉ. डांगे, जॉर्ज फर्नांडिस यांच्यानंतर मुंबई बंद करण्याची कोणत्या कामगार नेत्यामध्ये धमक असेल तर ती शरद रावांमध्ये होती, असे उद्गार पवार यांनी काढले. तसेच कामगार नेते म्हणून राव यांच्या यशाचं रहस्य म्हणजे त्यांची समाजाशी असलेली बांधिलकी, त्यांच्या या बांधिलकीमुळेच आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने जमलो आहोत, राव यांच्या निधनाने कामगारांसाठी अखेरपर्यंत संघर्ष करणारे लढवय्ये नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करत शरद राव यांना आदरांजली अर्पण केली.

संबंधित लेख