उरी येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

20 Sep 2016 , 06:12:48 PM

जम्मू-काश्मीरमधील उरी येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या छावणीवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले आहेत. वीरमरण प्राप्त झालेल्या शहीदांमध्ये महाराष्ट्राच्या चार जवानांचाही समावेश आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत निदर्शने करण्यात आली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाब शरीफ यांच्याफोटोला जोडे मारुन आणि पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करुन कार्यकर्त्यांनी हल्ल्याचा निषेध केला. तसेच पाकिस्तान मुर्दाबाद, नवाब शरीफ मुर्दाबाद अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

यावेळी बोलताना निलेश भोसले म्हणाले की, या अतिरेकी हल्ल्यांमागे पाकिस्तानच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता भारत सरकारने पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा न करता त्यांना चोख प्रत्युत्तर द्यावे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे पाकिस्तानमध्ये जाऊन अनोखी भेट देतात आणि पाकिस्तानचे पंतप्रधान आपल्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाला अशा प्रकारच्या अतिरेकी हल्ल्याची भेट देतात. तेव्हा जोपर्यंत असे दहशतवादी हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत आपल्या पंतप्रधानांनी पाकिस्तानशी मैत्रीचा हात पुढे करु नये, असे भोसले यावेळी म्हणाले.

संबंधित लेख