विदर्भातले चित्र बदलणार – सुनील तटकरे

29 Aug 2016 , 06:01:28 PM

विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्र येत्या काही कालावधीत निश्चितच बदलेल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. पक्षाच्यावतीने विदर्भ विभागीय बैठकीचे आयोजन आज नागपूर येथे करण्यात आले. या बैठकीत पक्षाच्या आगामी धोरणांबाबत तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमधील पक्षाच्या मोर्चेबांधणीबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी तटकरे यांनी विदर्भातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

२००४ साली राष्ट्रवादीचे ११ आमदार विदर्भातून निवडून आले होते. मात्र गेल्या निवडणुकीत येथून राष्ट्रवादीचा एकच आमदार निवडून आला आहे. या परिस्थितीचा सर्वांनीच गंभीरपणे विचार करणे गरजेचे असून ही परिस्थिती बदलण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे, असे मत तटकरेंनी यावेळी व्यक्त केले.

भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावरच लढवल्या जातील, असे त्यांनी यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केले. स्थानिक पातळीवरील आघाडीबाबतच्या निर्णयात स्थानिक नेत्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल मात्र निर्णय घेताना धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षाशिवाय कोणाबरोबरही आघाडी केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
यावेळी बोलताना त्यांनी देशातील सद्यस्थितीचाही परामर्श घेतला. देशातला कुठलाच वर्ग आजच्या घडील खूष नाही. सरकार विरोधात जनतेत प्रचंड नाराजी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवले पण अच्छे दिन आलेच नाहीत. लोकांचा विश्वास या सरकारने गमावला असल्यामुळेच चार सदस्य प्रभागाची रचना केल्याचा आरोप तटकरे यांनी केला. या सर्व स्थितीत, मागील काही कालावधीत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी क्रमांक दोनचा पक्ष होता. आता संघटन अजून मजबूत करून राष्ट्रवादीला क्रमांक एकचा पक्ष बनविणार, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

दरम्यान विदर्भातील सर्व नेत्यांची मते जाणून त्याबाबतचा अहवाल पक्षाध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांना सादर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवाय विदर्भात राष्ट्रवादीचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, हर्षवर्धन देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, सुभाष ठाकरे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार दिनानाथ पडोळे, धर्मराव बाबाराव आतराम उपस्थित होते.⁠⁠⁠⁠

संबंधित लेख