शिवबंधन, अटलबंधन नाही, आम्हाला फक्त 'रक्षाबंधन' माहित आहे - अजित पवार

23 Aug 2016 , 08:40:06 PM

विद्यमान केंद्र सरकार व राज्य सरकारच्या काळात जातीवाद व जातीयवाद्यांना अच्छे दिन आलेत. सामान्य माणूस अजूनही अच्छे दिनची प्रतीक्षा करत आहे. सरकार विकासाचे नाही तर सुडाचे राजकारण करत आहे, तेव्हा पराभवाने खचून न जाता लोकांमध्ये जाऊन वास्तव समजावून सांगा आणि लोकभावना समजून घ्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उदगीर येथे केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आयोजित केडर कॅम्पमध्ये युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

सरकारमधील मंत्र्यांनी केलेले घोटाळे लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत. चिक्कीचं नाव आलं की महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे आठवायला पाहिजेत, अशाप्रकारे या सरकारने केलेला भ्रष्टचार प्रत्येकाच्या मनामनात ठसवा. विद्यमान मंत्री विष्णू सावरा, विनोद तावडे, संभाजी पाटील निलंगेकर आदिंचे घोटाळेही लोकांसमोर आणा, असे उपस्थितांना पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही बंधनाची गरज नाही. इतर पक्षाप्रमाणे आम्ही अटल बंधन आणि शिवबंध का बांधावं? बांधल्यानं काय होतं? ज्याला सोडून जायचं आहे तो जातच असतो, असे सांगत आम्हाला फक्त रक्षाबंधन माहिती आहे आणि ते आमच्या बहिणींनी बांधलय असा टोला पवार यांनी लगावला. तसेच पक्षातील पदाधिकारी नेमणुकीत कसलेच गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ताकीद यावेळी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिली. तळागाळातील तरुणांची मोट बांधून पक्षाची ताकद वाढविण्याचं आवाहनही त्यांनी उपस्थितांना केलं.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही आपले विचार या शिबिरात व्यक्त केले. वीस महिन्यातील वीस भ्रष्ट मंत्र्यांच्या कारभाराची माहिती त्यांनी उपस्थितांसमोर ठेवली. हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून शेतकऱ्यांच्या बाबतीतही अतिशय असंवेदनशील आहे. मुठभर व्यापाऱ्यांना करोडो रुपयांची एल.बी.टी. माफ करणाऱ्या सरकारने कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता हीच पक्षाची खरी ताकद असल्याने या युवक कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी आहे. सरकारचा भ्रष्ट कारभार जनतेपर्यंत पोहचविण्याबरोबरच आदरणीय शरद पवार साहेब यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम या युवकांनी करावे असे आवाहन करतानाच अशा शिबिरांमधून सक्षम कार्यकर्ता निर्माण होईल असा विश्वासही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी केडर कॅम्पसाठी रायुकाँ प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, निरीक्षक हरीहरराव भोसीकर, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील, प्रदेश चिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, संजय बनसोडे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, महिला जिल्हाध्यक्षा भाग्यश्री क्षीरसागर, माजी आ़शिवराज तोंडचिरकर, कार्याध्यक्ष बबन भोसले, तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे, शहराध्यक्ष समद शेख, रायुकाँ जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर उपस्थित होते.


संबंधित लेख