शेतकऱ्यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण - अॅड. रविंद्र पगार

24 May 2016 , 10:28:45 PM

“शेतकऱ्यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण” अशी  जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केली आहे. सततची नापिकी तसेच कर्ज बाजारीपणाला कंटाळून बागलाण तालुक्यातील शेमळी येथील जिभाऊ बागुल या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची रविंद्र पगार यांनी मंगळवारी भेट घेतली. अस्मानी संकटात सापडेल्या शेतकऱ्यांना कुठलीही मदत न देता मोदी सरकारने शेतकरी विरोधी धोरणे राबविल्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप पगार यांनी केला. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींची खिल्ली उडविणारे व्यक्तव्य करण्याची स्पर्धाच सरकारचे मंत्री व सत्तारूढ पक्षाचे लोकप्रतिनिधी यांच्यात रंगत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

हतबल झालेला शेतकरी मोदी सरकारने राबविलेल्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे प्रचंड हतबल झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करत असूनदेखील युती सरकारला जाग येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता धीराने संकटांचा सामना करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता सातत्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यापुढील काळात देखील आक्रमक आंदोलने करून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असेही पगार यांनी स्पष्ट केले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बागलाण विधानसभा अध्यक्ष धर्मराज खैरनार, तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, पंचायत समितीचे उपसभापती वसंत भामरे, जिल्हा परिषदेचे सदस्य शैलेश सूर्यवंशी, सटाण्याचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, नगरसेवक भारत खैरनार हेदेखील उपस्थित होते.
 

संबंधित लेख