चांद्यापासून बांद्यापर्यंत सरकारविरूद्ध उठाव करा, सरकारला कर्जमाफी करायला भाग पाडा – अजित पवार

06 May 2016 , 11:12:05 PM

शेतकऱ्यांनो सरकारविरूद्ध उठाव करत चांद्यापासून बांद्यापर्यंत वणवा पसरवा, सरकारला कर्ज माफ करायला भाग पाडण्याचा संकल्प करा, असे आवाहन Ajit Pawar यांनी शेतकऱ्यांना केले. आज बीड येथे शेतकऱ्यांच्या दुष्काळ परिषदेत ते बोलत होते. सरकारला कर्जमाफी करायला भाग पाडूया असे सांगत अजित पवार यांनी दुष्काळ परिषदेत सरकारवर हल्लाबोल केला. तसेच शेतकऱ्यांना मोफत बियाणे, मोफत खते, बिनव्याजी पीक कर्ज नव्या हंगामासाठी मिळावे, अशी मागणीही त्यांनी या परिषदेत केली. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. विक्रम काळे, माजी आमदार सय्यदजी सलिम, माजी आमदार बदामराव पंडीत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रविकांत वर्पे, अक्षय मुंदडा हे उपस्थित होते.

कर्जमाफी केली तर बँकांना फायदा होतो असे मुख्यमंत्री म्हणतात. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असेल तर बँकांचा फायदा कसा? व्यापाऱ्यांसाठी 7 हजार कोटींचे एलबीटी माफ करता मग शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार का करत नाही? असे प्रश्न पवार यांनी उपस्थित केले. भाजप सरकार दुटप्पी राजकारण करत असून अच्छे दिन येणार सांगत शेतकऱ्यांची फसवणूक सरकारने केली आहे, असा आरोप त्यांनी केला. शेत मालाला भाव नाही, कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कोणी कांदा खरेदी करत नाही, व्यापारी फसवणूक करत आहेत, हे कसले अच्छे दिन? अशी टीका त्यांनी यावेळी केली.

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनाही राज्यात युद्धपातळीवर होण्याची गरज होती, पण तसे काहीही झालेले नाही. उच्च न्यायालय सतत सरकारवर दुष्काळ हाताळणीबाबत ताशेरे ओढत आहे. न्यायालयाला दुष्काळाबाबत सतत हस्तक्षेप करावा लागत आहे तरीही सरकारला जाग येत नाही. दुष्काळावरून लक्ष हटवण्यासाठी वेगळ्या मराठवाड्याचा मुद्दा काढला आहे, असा आरोप पवार यांनी केली. पण वेगळ्या मराठवाड्याची इथल्या लोकांची मागणी नाही. हा संयुक्त महाराष्ट्र आहे. त्याचे तुकडे होऊ देऊ नका, असे ते पुढे म्हणाले.

दुष्काळ भीषण होणार हे माहीत असताना आधी कोणतेही नियोजन केले गेले नाही. पाण्याचे कोणतेही नियोजन दिसत नाही. भीषण पाणाटंचाई आहे, लोकांना प्यायला पाणी नाही व बीडच्या पालकमंत्री म्हणतात दारू कारखान्याला पाणी द्या, यावरून दुष्काळाबाबत त्यांना असलेले गांभीर्य दिसते, अशी टीका पवारांनी केली. चिक्की घोटाळा झाला, डाळ घोटाळा झाला, त्याचे पुरावे दिले गेले तरीही हे सरकार असे काही झालेच नाही अशी भूमिका घेते, या सगळ्याचा अर्थ स्पष्ट आहे. मराठवाड्यात ऊसाचे पिक नको असे सरकार सांगते. त्यावर चर्चा मात्र ऊस न लावणारे करत आहेत. शेतकऱ्यांची पर्वा मात्र कोणालाच नाही. पण आपला शेतकरी जगला पाहीजे. तो सर्वांना जगवतो, हे सरकारने ध्यानात ठेवावे, असे पवार म्हणाले.

संबंधित लेख