मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता संसदेत मांडणार - सुप्रिया सुळे

23 Apr 2016 , 08:42:46 PM

मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता आणि पाण्याच्या दुर्भिक्ष्याची भीषणता आपण संसदेत मांडणार आहोत, असे दुष्काळी स्थितीची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनासही ही बाब आणणार असल्याचे त्या म्हणाल्या. पैठण तालुक्यातील पाचोड आणि परिसरातील ४० गावांत पाण्याचा प्रश्न भीषण आहे. हा प्रश्न चर्चेतून नक्की सोडवू. मात्र प्रश्नाबाबत समाधानकारक तोडगा न निघाल्यास सर्वांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष करू, असेही त्या म्हणाल्या. खासदार सुप्रिया सुळे यांचा  मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा नुकताच पार पडला.  या दोन दिवसीय दौऱ्यात औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना सुळे यांनी भेट दिली, तसेच तेथील परिस्थिती जाणून घेतली. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदार विक्रम काळे, आमदार अमरसिंह पंडित, युवक प्रदेश उपाध्यक्ष निलेश राऊत तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक या दौऱ्यात सहभाग घेतला. या दरम्यान त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर या भागातील विविध प्रकल्पांची पाहणीही केली.

स्व. अंकुशराव टोपे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सुप्रिया सुळे यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. यानंतर औरंगाबादच्या रोटी कपडा बँकेला भेट दिली तसेच पैठणजवळील चित्ते नदी पुनर्निर्माण प्रकल्पाचीही त्यांनी पाहणी केली. 

दौऱ्याला सुरुवात करताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मराठवाड्यातील बीअर कंपन्यांना पाणी द्यायचे की पिण्यासाठी पाणी द्यायचे, याचा प्राधान्यक्रम सरकारने ठरवावा, असा टोलाही खा. सुळे यांनी लगावला. “यापूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या तेव्हा तत्कालीन सरकारविरोधात कलम ३०२ चा गुन्हा दाखल करा, असे म्हणणारे आता सरकारमध्ये आहेत. आता तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे, अशा वेळी सरकारची भूमिका काय असणार आहे?” असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला. 


संबंधित लेख