भगिनींनो घाबरू नका, हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे- धनंजय मुंडे

04 Mar 2016 , 07:26:30 PM

भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पालकांना आपल्या लग्नाचा भार वाटू नये लग्नाचा विचार पुढे ढकलण्याचा सामूहिक निर्णय घेण्याऱ्या माजलगाव तालुक्यातील वारोळा तांडा येथील २५ मुलींच्या विवाहाची जबाबदारी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्वीकारली आहे. मुंडे यांच्या 'नाथ प्रतिष्ठान'च्या वतीने आतापर्यंत ९०० पेक्षा जास्त मुलींचे विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यात झाले असून 'या गावातील भगीनींच्या पाठीशी हा भाऊ आहे', असे वचन मुंडे यांनी दिले.

माजलगाव तालुक्यातील वारोळा तांडा येथील एका शेतकऱ्याच्या मुलीचा विवाह केवळ त्या शेतकऱ्याला पैशाची जुळवाजुळव दुष्काळामुळे न झाल्यामुळे मोडला होता. अशीच परिस्थिती गावातील इतर कुटुंबांची असल्यामुळे गावातील २५ सुशिक्षित मुलींनी एकत्र येत दुष्काळामुळे आम्ही आमचे विवाह लांबणीवर टाकू मात्र पालकांना त्याचा त्रास होऊ देणार नाही, असा निर्णय घेतला होता. या गोष्टीची माहिती मिळताच आज धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री आ.प्रकाशदादा सोळंके, विधानपरिषद सदस्य अमरसिंह पं‍डित यांच्यासह या गावास भेट दिली. विवाहाचा बेत पुढे ढकलणाऱ्या मुली, त्यांचे पालक आणि समस्त गावकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

दुष्काळामुळे आपल्या पाल्यांचे विवाह करणे शेतकऱ्यांना कठीण झाल्याची बाब सत्य असली तरी शेतकऱ्यांनी या प्रसंगात डगमगून जाऊन काही चुकीचे निर्णय घेऊ नयेत आपण त्यांच्यासोबत आणि पाठीशी आहोत, असे आश्वासन देतानाच या २५ मुलींचे तसेच गावातील इतरही उपवर मुला-मुलींचे विवाह परळी येथे २४ एप्रिलला आपल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सामूदायिक विवाह सोहळ्यात किंवा आ.अमरसिंह पंडित यांच्या शारदा प्रतिष्ठानच्या वतीने गेवराई येथे होणाऱ्या विवाह सोहळ्यात मोफत करून देऊ, असे आश्वासन दिले. मात्र गावकऱ्यांनी या मुलीचे विवाह गावातच करण्याची इच्छा व्यक्त करताच तुम्ही विवाहाची तयारी करा, त्याची सर्व जबाबदारी आम्ही स्वत: घेऊ आणि गावात येऊन या मुलींचे कन्यादान करून देण्याचा शब्द दिला. 

यावेळी दिपकराव जाधव, तालुक्याध्यक्ष भिमकराव हाडुळे, शहराध्यक्ष नवाब पटेल, सरपंच तुकाराम चव्हाण, नितीन नाईकनवरे, कल्याण आबुज, विश्वंभर थावरे आदीही उपस्थित होते.

संबंधित लेख