शरद पवार यांची दिल्लीमध्ये महत्त्वाच्या विषयांवर पत्रकार परिषद

01 Mar 2016 , 05:52:16 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी आज महत्त्वाच्या विषयांवर दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार तारिक अन्वर, राष्ट्रीय सरचिटणीस डि.पी. त्रिपाठी, कायमस्वरूपी सचिव एस. आर. कोहली, राष्ट्रीय सरचिटणीस पितांबर मास्टर, राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते नरेंद्र वर्मा उपस्थित होते.  आगामी पाच राज्यातील निवडणुका, काल सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प आणि मनुष्यबळ राज्यमंत्री रामशंकर कठेरिया यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

बजेटमध्ये काहीच नवे नसल्याचेही पवारसाहेबांनी म्हटले आहे. युपीएचेच बजेट पुढे घेऊन जात आहे. 'मनरेगा'ला मोठा निधी दिला हे चांगलं केलं, मात्र हेच पंतप्रधान 'मनरेगा'संदर्भात काय काय बोलले होते ते आठवतंय. युपीएची योजना चांगली होती, हे अखेर मान्य करावंच लागलं, असा टोलाही पवारसाहेबांनी लगावला.  ईपीएफ हा मध्यमवर्गाचा आधार असतो. त्यावर टॅक्स लावणं म्हणजे त्या आधारावरच केलेला हल्ला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

हे बजेट शेतकरी आणि ग्रामीण वर्गाचं आहे असा प्रचार सुरू आहे. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. कृषिक्षेत्रासंदर्भात देत असलेली आश्वासने दिशाभूल करणारी आहेत. २०२२ सालापर्यंत उत्पन्न दुप्पट होण्यासाठी प्रतिवर्षी १२ ते १५.५ टक्के वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतुदी करणे आवश्यक होते, मात्र त्या केल्या गेल्या नाहीत. अशा परिस्थितीत कृषिउत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन किती विश्वासार्ह आहे, याबाबत प्रश्नच आहे. २०२२ साल अजून बरेच दूर आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून प्रथमच ३५ हजार ९०० कोटी रुपये अलॉट केल्याची जी माहिती देण्यात आली आहे, त्यातही सत्यता नाही. प्रत्यक्षात २० हजार ९०० कोटी दिले जात आहेत. वरील १५ हजार कोटी बँकेचा सरप्लस असून त्याचे नाव बदलून ते दाखवण्यात आले आहे, असे पवारसाहेब म्हणाले. 

बजेटमध्ये घोषणा खूप आहेत. मोठे आकडे आहेत. प्रत्येक आकड्यापुढे ते कुठून उभे करणार हे लिहीलंय. ते उभे राहतील तेव्हा कामं होतील. मात्र ते उभे करण्यासाठी काय उपाय आहेत हे मात्र सांगत नाहीत, असे पवारसाहेब म्हणाले.

आग्र्याला एका हिंदुत्ववादी नेत्याच्या शोकसभेत मनुष्यबळ राज्यमंत्री रामशंकर कठेरिया यांनी मुस्लिमांसंदर्भात जे अनुद्गार काढले, त्याबद्दल काल झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निषेधाचा ठराव संमत करण्यात आल्याचे पवारसाहेबांनी स्पष्ट केले. निव्वळ सांप्रदायिक तणावाच्या मुद्यांच्या वेळीच नाही तर जेव्हा जेव्हा गंभीर तणावाचे मुद्दे येतात तेव्हा तेव्हा पंतप्रधान काही बोलत नाहीत. त्यांच्या 'मन की बात' मध्ये हे मुद्दे येत नाहीत, यावरही पवारसाहेबांनी टीका केली.

पाच राज्यांमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकींमध्ये पाचपैकी केरळ, आसाम आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत लढणार आहोत तर केरळमध्ये डाव्या पक्षांसोबत लढणार आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या रणनीतीबाबत प्रदेशाध्यक्षांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. आसाममध्ये राष्ट्रीय सचिव नरेंद्र वर्मा यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. किती जागा लढायच्या आणि निवडणुकीची रणनीती ठरवण्याची जबाबदारी पक्षाने वर्मा यांच्यावर सोपवली असल्याचे पवारसाहेबांनी स्पष्ट केले आहे.   

संबंधित लेख