राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली, लातूर, इंदापूर घटनेप्रकरणी आरोपींवर कडक कारवाई व्हावी- धनंजय मुंडे

23 Feb 2016 , 08:06:47 PM


लातुर जिल्ह्यातील पानगाव येथे अल्पसंख्याक समाजाच्या पोलिस अधिकार्‍यास झालेली मारहाण आणि इंदापुर येथे दलित समाजातील मायलेकींना निर्वस्त्र करून झडती घेणे या दोन्ही घटना म्हणजे राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे द्योतक असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

विधान भवनात पत्रकारांशी बोलतांना जनतेचे रक्षण करणारे पोलिसच या राज्यात असुरक्षित ठरत असून या प्रकरणातील पोलिसांची आपण भेट घेणार असून अशा प्रकारे भगवा झेंडा हातात घेऊन दहशत निर्माण करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अल्पसंख्याक असलेल्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचे रक्षण करणार्‍या पोलिसांवर भगवे झेंडे घेऊन हल्ला करणारे खरोखरच शिवरायांचे अनुयायी आहेत का असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 


अधिवेशनाचा कालावधी वाढवा ! 

राज्यातील प्रचंड दुष्काळ आणि विविध प्रश्‍नांवर चर्चा करावयाची असल्याने ९ मार्चपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन १३ एप्रिलऐवजी एप्रिलच्या शेवटपर्यंत वाढवण्याची मागणी आपण आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली असल्याची माहिती त्यांनी दिली. 


मंत्र्यांचे दुष्काळी दौरे हे उशिराचे शहाणपण

अधिवेशनाच्या तोंडावर राज्यातील मंत्री दुष्काळी दौर्‍यावर जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हे दौरे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असून हे  उशीरा सुचलेले शहाणपण आहे. तीन महिन्यांपूर्वी असे दौरे केले असते तर आज दुष्काळात होरपळणार्‍या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असता असेही मुंडे म्हणाले.


बाटलीबंद पाण्याचे प्रकल्प ताब्यात घ्या 

राज्यात एकीकडे पाणी टंचाई असताना दुसरीकडे बाटलीबंद पाण्याचे गोरख धंदे राजरोस चालू असून पाण्याची अव्वाच्या सव्वा दराने विक्री करून जनतेची लूट करत आहेत. त्यामुळे हे बाटलीबंद पाण्याचे प्रकल्प शासनाने ताब्यात घेऊन मोफत पाणी वितरण करावे अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित लेख