प्रथम स्मृतिदिनानिमित्त अंजनी गावी ज्येष्ठ नेत्यांनी वाहिली आबांना आदरांजली

16 Feb 2016 , 07:35:53 PM

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील उर्फ आबा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आज तासगाव तालुक्यातील अंजनी या त्यांच्या गावी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी आदरांजली वाहिली. 

आदरांजलीपर झालेल्या सभेत जयंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. तसेच शरद पवार, सुनिल तटकरे, नारायण राणे यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला. आबांच्या कन्या स्मिता पाटील यांनी सभेचे आभारप्रदर्शन केले.

"काही माणसे अशी असतात की त्यांच्या कर्तृत्वाने, वागण्याने, समाजाच्या उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी त्यांनी केलेल्या कष्टाने, सार्वजनिक जीवनामध्ये लोकांच्यामध्ये कसे राहावे याचा ते आदर्श ठरतात. या सगळ्यांमध्ये आर.आर. हे बसणारे आहेत." असे शरद पवार यांनी आर. आर. पाटील यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करताना म्हटले.

'वर्षातला एकही दिवस, दिवसातला एकही तास, एकही क्षण आबांच्या आठवणीशिवाय गेला नाही. कर्तृत्ववान नेतृत्व किती मोठ्या प्रमाणावर आपली प्रतिमा निर्माण करू शकते हे आबांच्या रूपाने महाराष्ट्राने अनुभवले,' अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आपल्या भावना मांडल्या.

'आबांनी दाखवलेल्या मार्गाने शिस्तबद्धरीत्या पुढे जात त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करुया. आबांचा जवळचा मित्र तसेच सहकारी या नात्याने मी ही सर्व कामे पूर्णत्वाला नेण्याकरता सर्वांच्या साथीने प्रयत्नशील राहीन.' असे प्रतिपादन अजित पवार यांनी आबा यांच्या आठवणींना उजाळा देताना केले. 

यावेळी आदरणीय शरद पवार, सुनील तटकरे, अजितदादा पवार, गटनेते जयंत पाटील यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, ग्रामविकास राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते दिपक केसरकर, विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे तासगावच्या आमदार आणि स्व. आबांच्या पत्नी सुमनताई पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, माजी खासदार प्रतिक पाटील, आमदार प्रकाश गजभिये, माजी राज्यमंत्री सुरेश धस आणि दक्षिण-मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील उपस्थित होते.

संबंधित लेख