उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडून रमजान महिन्याच्या शुभेच्छा, नमाज, तरावीह पठण, इफ्तारसारखे धार्मिक कार्यक्रम घरातच करण्याचे आवाहन

25 Apr 2020 , 12:28:55 PM


उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी पवित्र रमजान महिन्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या आठवडाअखेरीस सुरु होत असलेल्या रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी मशीद किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता आपापल्या घरात थांबूनच नमाज, तरावीह पठण, इफ्तार, धार्मिक प्रार्थना आदी धार्मिक कार्यक्रम करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे. देशवासियांची एकजूटच कोरोनाविरुद्धच्या लढाईत विजय मिळवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्व देशवासियांचं योगदान आवश्यक आहे. मुस्लिम धर्मगुरुंनीही मुस्लिम बांधवांना धार्मिक स्थळी एकत्र न येता आपापल्या घरीच थांबून नमाज, तरावीह पठण, इफ्तार, धार्मिक प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनांचं आतापर्यंत काटेकोर पालन केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांचे आभार मानले आहेत. रमजानच्या काळातही कोरोना प्रतिबंधक नियम, निर्देशांचं काटेकोर पालन करावं, कोरोनापासून स्वत:चं, कुटुंबाचं, समाजाचं संरक्षण करावं, असं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

रमजानाच्या काळातही मुस्लिम बांधवांनी घरातच थांबावं, कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर गर्दी करु नये, नमाज पठण, तरावीह, इफ्तारसाठी मशिदीत, रस्त्यावर, मैदानात एकत्र येऊ नये. कोणत्याही स्वरुपाचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नये, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वांची एकजूटच यश मिळवून देणार आहे याचं भान ठेवून जात-पात, धर्म-भाषा, प्रांत-पंथ हे सर्व भेदाभेद विसरुन आपण सर्वांनी एकत्र येऊया, असंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

संबंधित लेख