पालघर घटनेला जातीय रंग देऊ नका – ना. अनिल देशमुख

25 Apr 2020 , 12:25:30 PM


पालघर जिल्हयात घडलेली घटना ही अत्यंत दुर्देवी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. घटनेनंतर लगेचच पोलीसांनी १०१ व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी कोणीही मुस्लीम नाही. त्यामुळे या घटनेस कृपया जातीय रंग देऊ नये असे आवाहन गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी केले आहे.

ही घटना घडलेली जागा अत्यंत दुर्गम भागात असून बहुतांशकरुन ७० टक्के आदिवासी भाग आहे. पोलीस रिपोर्ट प्रमाणे या परिसरात कोणीही मुस्लीम व्यक्ती राहत नाही. डहाणू तालुक्यातील गडचिंचले हे स्थळ केंद्रशासित प्रदेश असलेले दादरा - नगर हवेलीच्या सिमेपासून ३०० मीटर अंतरावर आहे. घटनास्थळाकडे जाणारा रस्ता हा दुर्गम जंगल भागातील व नियमित वापराचा नाही. काही दिवसांपासून या परिसरात रात्रीच्या वेळी वेषांतर करुन मुले पळविणारी टोळी फिरते अशा अफवा पसरल्या होत्या. त्यातून ही घटना रात्री घडली. ही निंदनीय घटना थांबवण्याचा प्रयत्न तेथील पोलीसांनी केला मात्र त्या घटनास्थळी लाठयाकाठया घेऊन मोठया संख्येने लोकांचा जमाव होता. त्यांच्या तुलनेत पोलीसांची संख्या फारच कमी होती. घटनेचा तपास सीआयडीद्वारे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत व तपास झाल्यावर जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

घटनेला काही मंडळींद्वारे जातीय रंग देण्याचा दुर्दैवी प्रयत्न करण्यात येतोय. सध्या संपूर्ण महाराष्ट्र कोरोना विरुद्ध लढाई लढत आहे. पोलीस विभाग, आरोग्य विभाग यांच्या सोबत संपूर्ण शासकीय यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. असे असताना पालघर प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. सर्वांनी एकत्रित येऊन कोरोनाविरुद्ध लढा द्यावा आणि आपल्या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

संबंधित लेख