कुपोषण रोखण्याकरिता बनवलेली योजनाच कुपोषित - चित्रा वाघ

13 Feb 2016 , 02:47:22 PM


राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ सध्या राज्यातील कुपोषणग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याअंतर्गत त्यांनी सर्वप्रथम नंदूरबार जिल्ह्याला भेट दिली. कुपोषण हा महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांपैकी एक मोठा प्रश्न असून कुपोषण रोखण्याकरिता बनवलेली योजनाच कुपोषणग्रस्त झालेली आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. राज्यातील अशा प्रत्येक कुपोषणग्रस्त जिल्ह्यात जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून याविरोधात आवाज उठवण्याचे काम यापुढे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष करणार असल्याचे चित्राताई म्हणाल्या. 

आघाडी सरकारने कुपोषण रोखण्याकरता ग्राम बालविकास केंद्रांची स्थापना आपल्या कार्यकालात केली होती आणि या योजनेची यशस्वी अंमलबजावणी सुरू होती. पण मधल्या काळात ही योजनाच कुपोषित झाली असून कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. नंदूरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील कुपोषणग्रस्त भागांना भेट दिल्यावर तेथील भीषण परिस्थिती पाहून आपण व्यथित झालो, असे चित्राताई म्हणाल्या. धडगावमधील खुंटा मोळी, मोलगी, सोन, पिंपळखुंटा येथील अंगणवाड्यांना त्यांनी भेटी दिल्या. सरकारी कागदपत्रांनुसार धडगाव तालुक्यात महिन्याला ५० बालकं कुपोषणामुळे मृत्यूमुखी पडत असून प्रत्यक्ष परिस्थिती याहून बिकट आहे. मुलांना दिला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा आहे. बेचव व सपक खिचडी मुलांना रोज आहारात दिली जात असून, १० मुलांना पुरेल इतकी खिचडी ४५ मुलांमध्ये वाटली जात असल्याचं चित्राताईंनी केलेल्या पाहणीत आढळून आले. तसेच घरी नेण्यासाठी मुलांना दिले जाणारे धान्यही अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड झाले. अळ्या आणि कीड लागलेल्या धान्याचा पुरवठा मुलांना होत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. तसेच मुलांच्या वजनाची नोंद नियमीतपणे व्हावी यासाठी अंगणवाड्यांमध्ये असलेले वजनकाटेदेखील धुळ खात पडले असल्याचे धक्कादायक वास्तव यावेळी पाहायला मिळाल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. 

याप्रमाणेच धडगाव तालुक्यातील सोनगावच्या आदीवासी आश्रमशाळेलाही चित्राताईंनी भेट दिली. या आश्रमशाळेतील स्वयंपाकघर आणि धान्यकोठार पाहिल्यानंतर तेथील परिस्थितीही धक्कादायक असल्याचे निदर्शनास आले. गहू, तांदूळ, तुरडाळ, मुग-हरभरे कीड लागलेल्या अवस्थेत तर केळी, सफरचंदासारखी फळे सडलेली असल्याचे आढळून आले. आश्रम शाळेतील ही मुले अतिशय दुर्गम भागातून ज्ञानार्जनसाठी येत असताना त्यांना अश्या पध्दतीचे निकृष्ट खाणे दिले जात असल्याचे पाहून मन विषण्ण झाल्याचे चित्राताईंनी सांगितले. 

या सर्व आश्रमशाळांमधील मुलांना अंडी आणि बिस्किटांचे वाटप चित्राताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांकरून करण्यात आले. या संपूर्ण दौऱ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भारती पवार, नंदूरबारचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, महिला जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे, युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी आणि धडगावचे तालुकाध्यक्ष विजय पराडके त्यांच्यासोबत सहभागी झाले होते.  


#ncp #chitrawagh #maharashtra #nandurbar #malnutrition #children 

संबंधित लेख