आगामी विधानसभा निवडणुकीत तरूणांना संधी देणार – जयंत पाटील

01 Jun 2019 , 05:44:40 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्वसाधारण बैठक मुंबई येथे आज होत असून त्यामध्ये आमदार, खासदार तसेच निवडणुकीतील उमेदवार व कार्यकारिणीतील सदस्य उपस्थित आहेत. निवडणुकीचा आढावा व आगामी विधानसभा निवडणणुकीबाबत सविस्तर चर्चा बैठकीत झाली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येत्या काळात पक्ष तरुणांना संधी देणार असल्याचे स्पष्ट केले. येत्या डिसेंबर महिन्यात शरद पवार साहेबांचा ७९ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाला आपण साहेबांना ८० आमदारांची भेट देऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळेल, असे भाकीत अनेक अभ्यासकांनी केले होते. १०-१२ जागा पक्षाने जिंकणे अपेक्षित होते. मात्र हवे तसे यश पक्षाला मिळाले नाही. पक्षाला ५ जागा मिळाल्या, या सर्व नवनिर्वाचित खासदारांचे पाटील यांनी अभिनंदन केले, तसेच निष्ठेने केलेल्या कामाबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकही कार्यकर्ता कमी पडला नाही. आपल्याला पराभव मिळाला असला तरी आपल्या मतांची टक्केवारी वाढली आहे. मावळ, बीड, ठाणे अशा अनेक मतदारसंघात आपली मतांची टक्केवारी वाढली आहे, असेही पाटील म्हणाले.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, भाजपाचा विजय झाला हे मान्य.. पण भाजपला बहुमत मिळेल याची शाश्वती नव्हती. देशामध्ये सरकारविरोधी वातावरण होते. रोजगार, महागाई, जातीवाद, नोटबंदी याबाबत लोक बोलत होते, मात्र निकाल काही वेगळेच लागले. त्यामुळे हा विजय भाजपाचा आहे की ईव्हीएमचा असा प्रश्न उद्भवतो. आपल्याकडे असे ३७० मतदारसंघ आहेत ज्यात ईव्हीएममध्ये अफरातफर झाल्याचं प्राथमिक पाहणीत दिसत आहे. इतर पक्ष आचारसंहितेचा भंग होऊ नये याची खबरदारी घेत होते, मात्र भाजपने आचारसंहितेचा बट्ट्याबोळ केला.

वंचित बहुजन आघाडीचा मित्रपक्ष महाआघाडीच्या मतांवर परिणाम झाला आहे. त्याचा फटका ८ जागांवर बसला आहे. पण आता पराभव मागे सारून आपण पुन्हा उठून उभे रहायला हवे. लवकरच विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागतील. आपण पंधरा वर्षात काय काय काम केले ते जनतेला सांगायला हवे. आपण लोकांचे प्रश्न मांडूया. जीएसटी, नोटबंदी आणि इतर गोष्टींबाबत आपण लोकांना जागरूक करायला हवे. जे लोकसभेला घडले ते विधानसभेतही घडेल असं नाही. नाउमेद न होता आपली पूर्ण ताकद लावा आणि विजय खेचून आणा, असे आवाहन पाटील यांनी पक्ष कार्यकत्यांना केले.

संबंधित लेख